Summary of the Book
आपल्या न्यायी मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्थांसाठी केलेलं तीव्र आंदोलन म्हणजेच 'लढा साडेबाराचा' ही कादंबरी आहे. औद्योगिकीकरणात भरडल्या जाणाऱ्या जगभरातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा, शहरी जीवनशैलीत जगण्यात झालेली उपेक्षा;अशा अनेक सत्यकथांद्वारे प्रकल्पग्रस्तांची 'काळी बाजू' लेखकाने सशक्तपणे मांडली आहे. जमिनीचा मोबदला किंवा पर्यायी जागा देऊन पुनर्वसनाचा गुंता सुटत नाही, तर त्यामुळे एक पुरातन संस्कृती उद्ध्वस्त होते, हे दर्शविताना सर्वच सहाय्यक व्यक्तिरेखांच्या भावभावनांचे चित्रण या कादंबरीत मोठ्या कल्पकतेने टिपले आहे. नव्या-जुन्या पिढीतील संघर्ष, बदलती जीवनशैली, सामाजिक अध:पतन इत्यादी सर्व घटनांचे हुबेहूब रेखाटन केले आहे.
संकल्पनेचा दृष्टीकोन, शैली, मांडणी या विषयी इथे व्यामिश्रतेने प्रयोग करून तौलनिक साहित्याभ्यासात स्थळ, काळ, दृष्टीकोन, भावनिक अंग यांचा साम्यभेद चपखलपणे मांडलेला आहे. लेखकाने काही प्रसंगी वैचारीक व्युहाने साहित्य व्यवहारातील महत्वाच्या घटकांना निश्चित स्वरूपाचा साहित्यक्षेत्रीय न्याय मिळवून दिलेला आहे. तसेच प्रतिमांच्या पारिभाषिक शब्दांमुळे अभिरुचीसंपन्नता येऊन उदबोधात्मक विचारांचे प्रकटीकरण वाचकांचा मनावर बिंबवण्यात लेखक यशस्वी झाला आहे. निवेदन प्रमाण भाषेत असून संवाद बोलीभाषेत असल्यामुळे आगरेतर बोलीचे वाचक आणि समीक्षक या कादंबरीचे स्वागत करतीलच!