Summary of the Book
आजच्या विज्ञानयुगात समाजात अजूनही स्त्रीभ्रूणहत्या होत आहे. अगदी सुशिक्षित समाजात मुलगाच हवा हा हट्ट असतो. हेच वास्तव शकील शेख यांनी 'एका गर्भाशयाची गोष्ट' या कादंबरीतून दाखविले आहे.
मात्र यातील आई होणारी मुग्धा या विरोधात आवाज उठविते. पोतदार कुटुंबातील पोतदार बाई या पेशाने शिक्षिका; पण घरात मात्र सून मुग्धाला पहिल्या मुलीनंतर मुलगाच हवा या अट्टाहासापायी एकदा गर्भ पाडायला लावतात.
पतीही आईला साथ देतो. स्वतःची आईही आपल्याबरोबर नाही, याचे मुग्धाला दु:ख होते. तिसऱ्या वेळी मात्र गर्भ मुलीचा आहे. हे कळल्यावर ती बंड पुकारते. या वेळी पतीची साथ लाभल्याने बळ मिळते. शिवाय सासरेही पाठींबा देतात. मात्र सासू ऐकत नाही. शेवटी आत्महत्या करण्यासाठी निघालेली मुग्धा पोटातील जीवासाठी जगण्याचा निर्णय घेते.
अनेक दिवस बाहेर राहून कन्यारत्नाला जन्म देते. घरी आल्यावर सासू तिच्या विरोधात बेअब्रू केल्याचा खटला दाखल करते; पण मुग्धाची बाजू न्याय असल्याने ती जिंकते. समाज, त्यातील व्यक्तींची विविध रूपे यातील पात्रांच्या रुपाने भेटतात.