Summary of the Book
आनंद श्रीकृष्ण, यांचा जन्म उत्तरप्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यातील बेनीपूर या छोट्या खेडेगावात झाला. कृषी अर्थशास्त्र या विषयात त्यांनी मास्टर्स पदवी प्राप्त केली. भारतीय राजस्व सेवेत ते 1986 साली दाखल झाले. आणि सध्या ते आयकर आयुक्त म्हणून आहेत.
कबीरपंथ, स्वामी नारायण संप्रदाय, रेकी आणि सिद्ध समाधी योग आदींचे गहन अध्ययन केल्यानंतर त्यांनी धम्माचा स्वीकार केला. तेव्हापासून बुद्धांच्या शिकवणुकीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे. आचार्य सत्यनारायण गोएंका यांनी पुनरुज्जीवन केलेल्या विपस्सना ध्यानपद्धतीचे ते आता आघाडीचे पार्हक बनले आहेत.
जपान, म्यानमार, भूतान आणि थायलंड सह अनेक देशांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. धम्मसार या त्यांच्या पहिल्या हिंदी ग्रंथाच्या एक लाख प्रती विक्री झाल्या आणि एक राष्ट्रीय उच्चांक प्रस्थापित झाला. त्यांनी लिहिलेला दूसरा ग्रंथ म्हणजे भगवान बुद्धः धम्म-सार व धम्म-चर्या हा ग्रंथ ही देशभर गाजला. हा त्याचा मराठी अनुवाद असून ह्याचे गुजराती व इंग्रजी अनुवाद ही प्रकाशित झालेले आहेत. धम्माचा स्वीकार केल्यानंतर श्रीकृष्ण हे आपले नाव बदलून त्यांनी आनंद हे नाव धारण केले.
भगवान बुद्धः धम्म-सार आणि धम्म-चर्या
प्रस्तुत ग्रंथात बौद्ध धम्माचे अत्यंत सोप्या आणि ओधवत्या भाषेत वर्णन आहे. धम्माबद्दल लेखकाची भावना अभूतपूर्व स्वरूपात प्रकट झाली आहे. धम्मापासून आपल्याला होणारा बोध लेखकाने मांडून दाखवला आहे. जीवनाबद्दल गौतम बुद्धाला असणारा अतीव आदर आणि समाजकल्याणासाठी ऐहिक मोहाचा त्याग करण्याबाबतचा त्यांचा निर्धार या ग्रंथात सतत प्रतीत होतो. बुद्ध म्हणत असे की हिंसा हिंसेलाच जन्म देते तर आग कधीच दुसरी आग विझवू शकत नाही. परंतु प्रेमाने द्वेषावर मात करता येते. स्वतः शांतता प्राप्त करणाराच जगास शांततेच्या मार्गावर नेऊ शकतो.
आपले दैनंदिन जीवन बुद्धाने आखून दिलेल्या मार्गावर कसे विकसित होऊ शकते याचे विवेचन अत्यंत सोप्या शब्दात लेखकाने केले आहे. खुनी दरोडेखोर अंगुलिमालाचे परिवर्तन अरहंत पदी कसे झाले किंवा दुष्ट चिंचायाचा बुद्धांविरुद्धचा कट कसा जगासमोर आला असे अनेक ऐतिहासिक प्रसंगांचे वर्णन लेखकाने अत्यंत कौशल्याने मूळ विषयाचे स्पष्टीकरण करताना केले आहे. बुद्धांचे जीवन, त्यांचे अनुयायी, त्यांच्या उपदेशाचे मर्म आदींचा सविस्तर परामर्श या ग्रंथाच्या 12 प्रकरणामधून घेण्यात आला आहे. परस्परावलंबी जीवनिर्मिती, विपासना ध्यानपद्धती, जगभरातील विपासना केंद्रांची माहिती. बैद्ध स्तुपाची छायाचित्रे, बौद्ध धम्मग्रंथातील सुत्त, बौद्धांचे सणवार आणि पवित्र स्थळे आदी भरपूर तपशील अत्यंत रोचक स्वरुपात वाचकांसमोर ठेवण्यात आला आहे. धम्मानुसार आचरण करू इच्छिणार्यांठी हा ग्रंथ निश्र्चितच मार्गदर्शक ठरेल.