Summary of the Book
सुजलाम सुफलाम अशा भारतभूमीचा हिंदू धर्म इथल्या निसर्गचक्रानुरूप वर्षभर विविध व्रत आणि सणांच्या माध्यमातून माणसाला अधिकाधिक धर्मप्रवण करीत आला आहे. प्रांतागणिक या व्रतांचे रूप बदलले असले तरी त्यांचे अंतस्थ सूत्ररूप एकच आहे. जेव्हा काळ-वेळेची अनुकूलता होती, सुबत्ता होती, निसर्ग आणि आपल्याला साह्य़भूत होणार्या पशु-पक्ष्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याइतपत उसंत होती, तेव्हा या व्रतांचे आणि सणांचे स्वरूप ऐसपैस होते. आज मात्र ज्यांचे निमित्त करून सामूहिक आनंद लुटता येईल, असेच सण आणि उत्सव प्रचलित असून अनेक व्रते तर अस्तंगत झाली आहेत. असे असले तरी या व्रतांची सांगोपांग माहिती देणार्या आणि ही व्रते आज सामाजिक जाणिवेची जोड देऊन जर पाळायची असतील तर ती कशी पाळता येतील, याबाबत मार्गदर्शन करणार्या ग्रंथाची गरज होती. ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर यांच्या ‘धर्मबोध’ या ग्रंथाने त्याची पूर्ती केली आहे.