Summary of the Book
माणसाच्या मनाचा थांग लागत नाही. तत्त्वज्ञ, कलावंत, शास्त्रज्ञ, संत-महात्मे माणसाच्या मनाचा गुंता सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत असतात आणि भय, गंड , विकार, एकटेपण, दुभंगलेपणा हा 'धन्याचा माल' पाठीवर घेऊन आपण सगळे आयुष्याच्या ओसाडीत भटकत असतो. बहुसंख्य तरुण जातात; काही मागे घुटमळत राहतात, तडतडत राहतात. 'दुख कि लंबी रात' असं जिणं जगत असतात. डॉ. नंदू मुलमुले हे निष्णात मनोव्यथातज्ज्ञ आहेत; परंतु व्यावसायिक फायद्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी या प्रश्नाचा सुजाणपणे, समग्रपणे विचार केलाय. 'संभ्रमाचे सांगाती' हे पुस्तक म्हणजे त्यांनी आपखुषीनं स्वीकारलेल्या व्रताची सांगता आहे.
मनोव्यथाग्रस्तांच्या केसेसचं निर्जंतुक संकलन, असं या पुस्तकाचं स्वरूप नाहीए. डॉ. मुलमुले जिव्हाळ मनानं देवांच्या लेकरांच्या गोष्टी सांगत आहेत. वाचकांना त्या निश्चितच आवडतील. या पुस्तकामुळे आपल्या समाजाची भावनिक साक्षरता वाढीस लागेल, असा विश्वास वाटतो.