Summary of the Book
ही कथा आहे दोन तरुण निष्पाप जीवांवर बेतलेल्या बनावट भानगडीची. जया आणि अजय ही संस्कारसंपन्न कुटुंबामधली निरागस मुले आहेत. कॉलेजमधल्या वर्गात एकत्र बोलताना पाहून कोणीतरी चावट मुलगा बाहेरून कडी लावतो. आणि बघता बघता या घटनेचे भांडवल केले जाते. प्राचार्यांच्या खुर्चीवर टपलेल्या विद्यार्थी, प्राध्यापक, पदाधिकारी, पत्रकार यांच्या स्वार्थासाठी पराचा कावळा केला जातो. प्राचार्य शहा हिकमतीने आपले पद टिकवतात. पण जया कुलकर्णीच्या रूपाने निरागसतेचा बळी जातो त्याचे काय? एका परीने शोकांतिका केवळ जया या तरुणीची नाही. ज्ञानाच्या पवित्र क्षेत्राला ग्रासून टाकणार्या, अनिष्ट प्रवृत्तींनी निर्माण केलेल्या शहरी-ग्रामीण नवसंस्कृतीच्या कचाट्यात सापडलेल्या समाजाची ही शोकांतिका आहे. ‘कल्चरल डायबेटिस’ झालेल्या बागायती ऊसपट्ट्यातील शुगरबेल्ट कल्चरचे प्रातिनिधिक चित्रण यात येते. ग्रामीण वृत्ती-प्रवृत्तींवर शहरी मूल्यांचे कलम केलेल्या नव्या सांस्कृतिसंकरात माणसे लाचार किंवा धूर्त बनतात. तसे न बनणारे शोषित किंवा उपरे ठरतात. ‘संख्येच्या बळावर सत्ता मिळते. विद्या नाही.’ असे सांगणारी, महाराष्ट्रातल्या शिक्षणक्षेत्रातल्या आजच्या राजकारणग्रस्त परिस्थितीचे भेदक विश्लेषण करणारी कादंबरी.
- दीपक घारे