Summary of the Book
सदर लेखात पु. ल.नी प्राचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे आपल्या अजोड विडंबनशैलीत कथन केले आहे.
पुलंनी पुस्तकावर केलेली विडंबनात्मक प्रस्तावना:
साहित्यात बराचसा मान मजकुरापेक्षा मथळ्यामुळे मिळतो हे ध्यानात येई पर्यंत पन्नाशी आली. आमचे उथळ लिखाण आम्ही उथळ आहे हे सांगून दिले होते. त्याशिवाय लोक खळखळून हसत नाहीत हा अनुभव होता. उथळ पाण्याप्रमाणे उथळ लिहिण्यालाही खळ्खळाट फार. इतक्या इमानाने सांगूनही अंखड ज्ञानेश्वरी एखाद्या कसरीसारखी खाऊन काढणारे विद्वान, लिटर लिटर शांतरस बसल्या बैठकीला रिचवणारे महापंडित(१), आम्ही विद्वत्तेचा धंदा न करता हसवण्याचा धंदा करतो म्हणून विषय सोडून आमच्या विरुध्द बरळू लागले. नशीब, विषयच सोडला. कारण त्यांचा संताप अनावर झाल्याचे कळले होते. हे सारे ऐकून आम्ही अंतर्मुख झालो. एकाएकी ‘मी’पणा जाऊन ‘आम्ही; पणा(२) आला. "खोली वाढवली पाहिजे", "खोली वाढवली पाहिजे" म्हणू लागलो. आमचे एक मित्र म्हणाले, त्यापेक्षा ओनरशिपचा ब्लॉक घ्या." त्यांचा वाङ्मयाशी संबंध नाही. नुसतेच वाचक आहेत. त्यांना वाङ्मयीन खोली कशी असते ठाऊक नाही. शेवटी ‘वाङ्मयाचा इतिहास’ लिहिण्याखेरीज गत्यंतर नाही हे उमगले.
मुकुंदराजाचा विवेकसिंधु, परमामृत, पवनविजय, मूलस्तंभ वगैरे न वाचल्याचे हे परिणाम आहेत हे ध्यानी आले. पहिला सोडून बाकीचे तीन हे वैद्यकीय ग्रंथ आहेत अशी आमची समजूत होती. आणि पहिला ग्रंथ नसून आयुर्वेद रसशाळेने बनविलेले औषध आहे असे मानीत होतो. आम्ही मुकुंदराज वाचला नाही, लोलिंबराज ठाऊक नाही, चांगदेवपासष्टी, ज्ञानेश्वरी(पसायदान तेवढे सभासंमेलनात ऐकून होतो), लल्ल कवीचा ‘रत्नकोश’, मोगलिपुत्त तिष्य (हा ग्रंथ की ग्रंथकार हे अजूनही ठाऊक नाही. सॉरी!), भोजलिंगाचे ‘महात्मसार’,मन्मथस्वामीचे ‘मन्मथबोधामृत’,म्हाइंभट्टाचा ‘पद्य खरडा’ (हा आदेश नसून ग्रंथ आहे), असले ग्रंथ आपण वाचले नाहीत ह्याचे परमदु:ख झाले. आणि अभ्यासासाठी म्हणून पूर्वसूरींचे आणि चालू सूरींचे ग्रंथ मागवले. चार-चार पाचपाच किलो वजनाचा तो एकेक ग्रंथ पाहून थक्क झालो आणि वाचू लागल्यावर एक जुने विनोदी व्यंगचित्र आठवले. (विनोदाशी हा शेवटला संबंध. यापुढे तलाक तलाक तलाक.)