Summary of the Book
२०११ साली अरब स्प्रिंग झालं. अरब प्रदेशातील हुकुमशाह्यांविरोधात तरुणांनी उठाव केला, स्वातंत्र्य आणि सुखी जीवन मागितलं. उठावाच लोण सीरियात पसरलं, तरुण रस्त्यावर उतरले, आंदोलन सुरु झालं. सीरियाचे अध्यक्ष बशर आसद यांनी बंदुका, रणगाडे विमानं वापरून आंदोलन दडपायला सुरवात केली. अमेरिका, रशिया, इराण, सौदी अरेबिया इत्यादी देशांनी व त्यांच्या गटांनी कधी सीरियन सरकारला तर कधी विरोधकांना मदत केली. युद्ध गृहयुद्ध राहिलं नाही, जागतिक झालं. सुमारे ४ लाख माणसं मेली. सुमारे ८ लाख माणसं देशातल्या देशातच बेघर झाली. सुमारे ५ लाख माणसं देश सोडून परागंदा झाली, इतर देशांच्या आश्रयाला गेली. देशाची धूळधाण झाली. अजूनही युद्ध थांबलेलं नाही, माणसं मरत आहेत, माणसं बेघर होत आहेत. निळू दामले यांनी या गृहयुद्धाची कथा पुस्तकात सांगितलीय . सीरियाचा प्राचीन इतिहास आणि संस्कृती या पुस्तकातून कळते. त्याबरोबरच अगदी तळातलं , एका गावातलं भीषण वास्तवही निळू दामले यांनी पुस्तकात रेखाटलंय. दुरून पहाणाऱ्याला युद्ध थरारक वाटतं. पॉप कॉर्न खात, चहा किंवा बियर घेताना युद्धाचा अनुभव जम मनोरंजक वाटतो. 'युध्यस्य कथा रम्य' असं माणसं म्हणतात. पण त्यात अडकलेल्या माणसांचे हाल, क्लेष, यातना ? त्याचं काय ? त्यांचं जगणं आपल्या वाट्याला आलं तर ? निळू दामले युद्धाचं दाहक वास्तव या पुस्तकात एखाद्या चित्रपटासारखं मांडतात.