Summary of the Book
गरिबी माणसाला मानसिकदृष्ट्या नेस्तनाबूत करून टाकते. पांगळं करून टाकते. असहाय करते. त्याच्या सगळ्या प्रगतीच्या वाटा बंद करते. ' गन गन भोवरी ' हा मूल अन् आई यांच्यातील अतूट प्रेमाचा , स्नेहाचा , एकमेकांवरील पराकोटीच्या आस्थेचा करुणामय जीवनप्रवास आहे , ज्यामुळे जीवनावरचा विश्वास अधिक दृढ होतो. या निमित्ताने चंद्रपूर-गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील 'झाडीपट्टी' म्हणून संबोधल्या जाणाऱ्या परिसरातील लोकजीवन, माणसं, जातिव्यवस्था, पराकोटीची गरिबी आणि कोंबडा आरवल्यापासून गुरंढोरं चरून येईपर्यंतच्या ऐंशी नव्वद वर्षं आधीपर्यंतच्या वातावरणात ते घेऊन जातात. सामाजिक जीवनासोबत सांस्कृतिक जीवनाचाही ते परिचय देतात.
आई-आजीचं दिवसरात्र कष्ट करणं, त्यांचं शिक्षणाप्रती प्रेम, तत्कालीन लग्नपद्धती, रीतिरिवाज, ढोराच्या मांसाकरिता गावात झालेला संघर्ष, आईचं वैधव्य, या प्रकारचं वेगळं जीवन 'गन गन भोवरीत' आलं असून मुख्य म्हणजे या परिसरातील बोलीभाषेतील शेकडो नवे शब्द यात आले असल्याने व तिथल्या भाषेचा बहुतांश उपयोग केल्याने कादंबरीसदृश या जीवनपटाला मातीचा दिलखेचक सुगंध आहे. त्यामुळे तिला एक अमूल्य सौष्ठव मिळालं आहे आणि मराठी माय भरमसाठ नवीन शब्द मिळाल्याने संपन्न झाली आहे.