Summary of the Book
सचिनची कारकीर्द ही क्रिकेटच्या इतिहासातलं एक महाकाव्य आहे…
मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव, तळपता तारा अशी विशेषणे लाभलेला सचिन तेंडूलकर याने क्रिकेटला एका उंचीवर नेलेच, शिवाय आदर्श खेळाडू कसा असावा, याचा आदर्श घालून दिला. वेगवेगळ्या विक्रमांना गवसणी घालणारा सचिन क्रिकेटमधून निवृत्त झाला शानदारपणे. सचिनच्या बॅटिंगने जगभरातील भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडला. त्याची कारकीर्द ही सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावी. द्वारकानाथ संझगिरी यांनी ती ''चिरंजीव सचिन'' मधून मांडली आहे.
अगदी सचिन च्या पहिल्या रणजीपासून ते त्याचे अंतरराष्ट्रीय सामने, विक्रम, त्याचे कर्तुत्व, त्या दरम्यान घडलेल्या घडामोडी, प्रसंग, सचिनचे कुटुंब, सर डॉन ब्रॅडमनपासून इतर महान खेळाडूंनी केलेले कौतुक वाचताना सचिनचे उत्तुंग व्यक्तिमत्व समोर उभे रहाते. पुस्तकातील मनोगतही वैशिट्यपूर्ण असून, त्यातूनच सचिन च्या महानतेची ओळख सुरु होते. छायाचित्रांमधून सचिनची वेगळी छबी उलगडते.
पहिल्या आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या इम्रान, अक्रम, वकार ह्या त्रिकूटाच्या वणव्याशी सचिन झुंजत होता, तेव्हा मायकेल शूमाकरने त्याच्या पहिल्या फार्म्युला वन शर्यतीत भागसुद्धा घेतला नव्हता, लान्स आर्मस्ट्रॉंगने टूर द फ्रान्स शर्यतीला सुरुवातसुद्धा केलेली नव्हती, दिएगो मॅराडोना अर्जेंटिनाच्या फूटबॉल संघाचा कर्णधार होता. पीट सॅम्प्रसने तोपर्यंत एकही ग्रँड स्लॅम जिंकलेली नव्हती. रॉजर फेडरर हे नावसुद्धा कानावरून गेलेलं नव्हतं. पण सचिन तेंडुलकरसमोर काळच थिजून उभा आहे. तो आजही चॅम्पीयन आहे…