Summary of the Book
मुकुंद टाकसाळे यांच्या विनोदी लेखनाने गेली दोन दशके वाचकांना निखळ आनंद दिला आहे. आचार-विचारातील अंतरामुळे व्यक्तिजीवनात व समाजव्यवहारात उत्पन्न होणार्या विसंगती टाकसाळे बारकाईने टिपतात, अंतर्विरोधांवर अचूकपणे बोट ठेवतात आणि मध्यमवर्गीय नीती-संकेतांमागील दांभिकताही सूचित करतात. सामान्य माणसांच्या बोलण्या-वागण्यातून, क्रिया-प्रतिक्रियांतून तर्काला बगल देणारे प्रसंग येथे सहजपणे घडतात. त्यातून वाचकाच्या मनात समकालीन संदर्भ जागे होतात. उपहास, उपरोध, श्लेष व शाब्दिक कोटी यांच्या आश्रयाने प्रकटणारा या कथांतील विनोद वाचकाला जसा खळखळून हसवतो तसाच तो अंतर्मुखही करतो. त्यामुळे ‘टाकसाळीतील नाण्यां’प्रमाणे या प्रसन्न ‘हास्यमुद्रा’ ही स्मरणात राहणार्या व संग्रही बाळगाव्यात अशा आहेत.
- रेखा इनामदार-साने