Summary of the Book
काही शब्द स्वतःचे अस्तित्व घेऊनच आकारास येतात . न सांगता , न बोलता तो शब्दच आपल्याला अबोल करत जातो . खुप व्यापक अर्थबोधाने काही शब्द मनावर निस्सीम अधिष्ठान प्राप्त करतात . जसे 'आई' म्हटले की ममत्वाचे पदर सहज उलगडतात . तसाच माझ्या हाती आलेला बोधक 'माऊली' कथासंग्रह .
निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याचे , लयीचे सुंदर वर्णन व त्याचबरोबर तिच्या ऱ्हासाचे नमुनेदाखल प्रसंग कथेचे पापुद्रे उलगडत जातात . त्यावेळी आपण निसर्गाचे एकही देणे लागतो या भावनेने कायमचे ऋणाईत होतो . आणि त्या परीसरातलेच एक होऊन जातो . अतिशय सामान्य जीवनशैलीतून भावनांची गुंतागुंत कथेची पकड घेते . आणि आपल्या आजूबाजूला सतत घडत असलेल्या घटनातून चांगल्या - वाईटाचा एक परीघ तयार होतो . नेमके चांगले कसे वेचायचे आणि वाईट का सारायचे याचा विचार प्रत्येक कथेचा बोलका संवाद होऊन जातो .
सहज , सुंदर , सोपी , जवळची , आपुलकीची भाषा , त्यातील वर्णने , विशेषतः निसर्गातल्या प्रत्येक जाणिवेची प्रतिके त्या त्या ठिकाणचा हिस्सा होऊन जातात . त्यामुळे प्रत्येक कथा आपापल्या पातळीवर सामाजिक भान घेऊन वावरते . ही जमेची बाजु सामान्य जाणिवेलाही उंचावर नेऊन ठेवील हा विश्वास वाटतो . एकंदरीत दहा कथांचा लेखक सुनील जाधव यांचा प्रवास सकारात्मक व बोधकच . त्यांच्या हातून असेच सक्षम , उल्लेखनीय लिखाण घडो व उत्तमोत्तम साहित्य कलाकृतीचे दालन समृद्ध होवो , हीच पुढील साहित्यिक वाटचालीसाठी मनस्वी सदिच्छा !