Summary of the Book
मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यासक्रमात नेमलेला ग्रंथ. या पुस्तकात नुसती स्त्री-पुरुषांच्या गुणावगुणांची तुलना केलेली नाही, तर पुरुष स्त्रीला कसं वागवत होता, कसं गृहीत धरत होता हेही मांडलं आहे. पुरुषाची बाईकडून कोणती अपेक्षा आहे आणि ती पूर्ण करणं हाच आपला धर्म आहे असं मानणार्या स्त्रियांविषयी लिहिताना ताराबाई म्हणतात, "स्त्रीधर्म म्हणजे काय? तर... निरंतर पतीची आज्ञा पाळणे, त्याचे मर्जीप्रमाणे वागणे, त्यांनी लाथा मारल्या, शिव्या दिल्या, दुसर्या रांडा ठेवल्या, नवरोजी दारू पिऊन, जुगार खेळून कफल्लक होऊन, शंख करीत, चोरी करून, कोणाचा प्राण घेऊन, फितुर, चहाडी, खजिना लुटून, लाच खाऊन जरी घरी आले तरी स्त्रियांनी आपले हे कोणी जसे काही कृष्णमहाराज गौळ्याचे दहीदूध चोरून, चंद्रावळीला कलंक लावून आलेत असे समजून परमात्यासारखी यांची मोठया हसतमुखाने देवासारखी पूजा करावी, सेवेत हजर राहावे हा स्त्री धर्म..." हा स्त्री धर्म पुरुषांनी स्त्रीच्या अंगी बाणवला आहे. ही आपली स्थितीच नैसर्गिक आहे असे समजून स्त्रिया जगतात. ताराबाईंच्या शब्दांत भोगण्याची वेदना आहे. साहजिकच स्त्रीच्या वाटयाला येणारे हे दु:खभोग व्यक्त करताना ताराबाईंची भाषा विलक्षण कडवट बनते.
महाराष्ट्र फौंडेशन (अमेरिका) चा पुरस्कार लाभलेला ग्रंथ. या विषयावरील महत्त्वाचे इंग्रजी मराठी दस्ताऐवज असलेली, अभ्यासपूर्ण आवृत्ती. (आठ परिशिष्टे) एकोणिसाव्या शतकातील स्त्रीपुरुषसत्तासंबंधाचे अभ्यासपूर्ण विवेचन. पुरुषांच्या दुर्गुणांचा मीमांसा. मराठीतील पहिल्या दलित निबंधाची यथामूल्य संहिता. मराठीतील पहिल्या स्त्रीवादी समीक्षेचे विवरण. भृणहत्येच्या गाजलेल्या विजयालक्ष्मी खटल्याचा दस्ताऐवज.