Summary of the Book
'लग्न होऊन वीस वर्ष झाली, तरी मला ह्यांचा पगार माहीत नाही...' वसुधाताई सहज बोलून गेल्या आणि ट्रेनच्या ग्रुपमधल्या बायकांसह इतर बायकांच्या नजरा वसुधा लेलेंकडे वळल्या.
'कमाल आहे. पण तुम्ही तरी विचारायचं...' रागिणी म्हणाली.
‘कशाला? दर महिन्याच्या घरखर्चासह, कपड्यालत्त्यांसह जे हवं ते मिळत असताना त्या पगाराचा आकडा कळला काय आणि नाही कळला काय.... काय फरक पडतो..?’
वसुधाताईंचं वाक्य तोडत त्यांच्याच वयाच्या असलेल्या सरोज म्हणाल्या, ‘अगं वसू, हे बरोबर नाही. त्यांनी तुझा पगार तरी नक्कीच विचारला असणार...’
‘छे! माझ्याशी कधीच पैशाबद्दल बोलत नाहीत ते. माझ्या पण आणि त्यांच्या पण...’ वसुधाताईंच्या उत्तरावर दोघी-तिघी जणी एका सुरात म्हणाल्या, ‘धन्य आहे हो तुमची!!’
समाजात अशा अनेक ‘वसुधाताई’ जागोजागी आढळतील. या वसुधाताई स्वत: कमावत्या असल्याने त्यांना त्यांच्या खर्चासाठी पैसे मागावे लागत नसतीलही, पण काही स्त्रियांना आपल्या पगाराचा पै न् पैचा हिशेब नवर्यांना द्यावा लागतो. पण नवर्यांचा पगार विचारला जरी, तरी घरात रणकंदन होतं. काही ठिकाणी बायकोच्या हातात ‘गृहलक्ष्मी’ म्हणून सगळा पगार ठेवून स्वत:च्या गरजेनुसार रक्कम मागून घेणारा पतीसुद्धा आढळतो. परंतु ‘गृहलक्ष्मी’ पैसे जपणारी, जाणीवपूर्वक गुंतवणूक करणारी असेल तर ठीक, नाहीतर हौसे-मजेत पैसे उडालेले कळतसुद्धा नाहीत.
वर्षानुवर्ष गृहिणीच्या भूमिकेतून आपल्या संसाराचं नियोजन करणार्या स्त्रीला वित्तव्यवस्थापन कौशल्यांचं वरदान उपजतच प्राप्त आहे. ही अंगभूत कौशल्यं वापरून आजची आधुनिक, सुशिक्षित स्त्री उपलब्ध पर्यायांद्वारे उत्तम आर्थिक नियोजन करू शकते. ते नेमकं कसं करावं याविषयी मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध वित्तव्यवस्थापन तज्ज्ञ, सल्लागार आणि अनेक वर्षं ‘लोकसत्ता’, ‘सकाळ’, ‘तरुण भारत’ यांसारख्या वृत्तपत्रांतून नियमितपणे अर्थविषयक सदरलेखन करणारे विनायक कुळकर्णी आपल्या ‘तिची लक्ष्मी’ या मैत्रेय प्रकाशनाच्या आगामी पुस्तकाद्वारे.
आजच्या, सर्वार्थाने स्वतंत्र स्त्रीला तिच्या हक्काची कमाई योग्य प्रकारे कशी गुंतवता येईल या विषयीचा हा अतिशय सोप्या आणि सहज शैलीतला मार्गदर्शनपर लेखसंग्रह. प्रत्येकीच्या आयुष्यातील विवाह, मुलांचं शिक्षण, निवृत्ती या महत्त्वाच्या टप्प्यांवर आर्थिक नियोजन कसं करावं, वित्त व्यवस्थापन करताना कोणती खबरदारी घ्यावी या मार्गदर्शनासोबतच शेअर्स, कर्ज, सोनं खरेदी, मेडिक्लेम, विमा इ. गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची सविस्तर चर्चा हे या पुस्तकाचं वैशिष्टय.