Ashwini Gore
09 Aug 2024 01 32 PM
मंगला आठलेकरांचं 'महापुरुषांच्या नजरेतून स्त्री' हे माझ्या बकेट लिस्ट मधल्या अनेक पुस्तकांपैकी एक. लेखिका मंगला आठलेकरांनी आपल्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनेत ह्या पुस्तकामागची भूमिका स्पष्टपणे मांडली आहेच आणि नंतरच्या सगळ्या प्रकरणांमध्ये काळाच्या मोठ्या पटलावर आपली नाममुद्रा उमटवलेल्या महापुरुषांच्या स्त्रीविषयक मतांवर परखड भाष्यही केलं आहे. हे पुस्तक वाचल्यावर नव्हे वाचतानाही अनेक प्रश्न मनात उमटत होते, अनेक शंकांचे समाधानही होत होते.
प्रस्तावनेतच जगातले चार प्रमुख धर्म मूलतः स्त्री बद्दल काय म्हणतात , खरं तर वेगळं असं काही म्हणत नाहीत, ते माणसाबद्दल बोलतात ज्यात स्त्री-पुरुष दोघेही येतात पण ह्या धर्मांमधल्या तत्त्वांचा आधार घेत पुढे तथाकथित धर्मसंस्थापकांनी , प्रेषितांनी , त्यांच्या अनुयायांनी त्याचा जो काही सोयीस्कर अर्थ लावला आहे, तोच मूळात स्त्रीच्या विरोधात जाणारा ठरला आहे. विशिष्ट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जे काही नियम तयार केले गेले असतील ते नंतरच्या काळात जणू काळ्या दगडावरची रेष बनले. ते नियम नियोजनपूर्वक समाजात पसरवले गेले, रुजवले गेले, त्याची मुळं इतकी घट्ट रुतली , फोफावली की आज सुद्धा आपण ती पूर्णपणे उपटू शकलेलो नाही. वैदिक काळात किंवा बौद्ध काळाच्या सुरवातीपर्यंत स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने शिक्षण घेत होत्या, धर्मकार्य करत होत्या, बालविवाहाची कुठलीही प्रथा नव्हती. हिंदू धर्माबद्दल बोलायचे झाले तर स्त्रीला बंधनांच्या चौकटीत अडकवण्याची सुरुवात मननुस्मृतीपासून झाली. लेखिकेने प्रस्तावनेतच हे नमूद केले आहे की भगवद्गीता जरी हिंदूंचा धर्मग्रंथ असला तरी कृष्ण हा काही त्यांचा एकमेव धर्मपुरुष नाही, त्यामुळे हिंदूंची सामाजिक चौकट ही गीतेवर आधारित नसून ती मनुस्मृतीला मानणारी आहे. हिंदू समाजातली चातुर्वर्ण्य व्यवस्था सुद्धा मनुस्मृतीचीच देणगी आहे. वेद, पुराणे, उपनिषदे दर्शने इत्यादींनी समृद्ध असलेला आपला धर्म मुळात चालतो कशाच्या आधारावर तर विषमता निर्माण करणार्या मनुस्मृतीवर , बरे ही विषमता इतकी खोलवर रुजलेली आहे की नंतर आलेल्या बौद्ध किंवा जैन धर्मांनाही ती पूर्णपणे काढून टाकता आलेली नाही. समतेवर आणि 'अहिंसा परमो धर्म ' मानणार्या बौद्ध धर्मातही स्त्रियांवर अन्यायच झालेला आहे, ह्याचे अनेक दाखले पुस्तकात आहेत. बौद्ध संघातील भिक्खुणींच्या प्रवेशासाठी गौतम बुद्धांनी घालून दिलेल्या अटी वाचल्या तर स्त्रीला बुद्ध किती दुय्यम दर्जा देत होते ते लक्षात येईल. जगाला मानवतेची, करुणेची शिकवण देणारा येशूचा ख्रिश्चन धर्म सुद्धा स्त्रियांच्या बाबतीत काही वेगळे सांगत नाही. येशूने त्याच्या संदेशात स्त्री पुरुष समानतेची शिकवण दिलेली असली तरी त्याच्या अनुयायांनी मात्र त्याची स्वतःच्या मनाप्रमाणे मोडतोड करून, नवे नियम, कायदे बनवून स्त्रियांच्या माथी मारले आहेत ,आणि साम, दाम, दंड, भेद वापरून धर्मप्रसार करणे हेच ज्या धर्माचे ध्येय आहे त्या मुस्लिम धर्माबद्दल काय बोलावे !!....प्रेषित मोहम्मदच जिथे 8 -10 विवाह करतात भले त्यातल्या काही ह्या विधवा स्त्रिया होत्या तिथे इतर स्त्रियांची अवस्था काय असणार ह्याचा आपण नक्कीच अंदाज करू शकतो. ह्या सगळ्या धर्मांचा तौलनिक अभ्यास करता थोड्याफार फरकाने स्त्रीविषयक विचार सारखेच दिसतात, स्त्री हे मोहाचे मूळ आहे, ती फक्त भोगवस्तू आहे , तिला स्वतंत्र बुद्धी नाही , विचार नाही ,मन भावना नाहीत, स्वतंत्र अस्तित्व नाही. तिच्या नशिबाने तिने जे मिळेल ते आनंदाने स्वीकारावे आणि जे तिच्यापासून हिरावले गेले ह्याला तिचेच दुष्कर्म जबाबदार आहे हे तिने ध्यानात ठेवावे. हजारो वर्षे अशीच गेल्यानंतर ब्रिटिशांच्या माध्यामातून त्या काळातील प्रागतिक अशी राजसत्ता आपल्यावर राज्य करायला लागली, आधुनिक शिक्षणपद्धतीने होणारे बदल, प्रगती याची देही याची डोळा बघता येऊ लागली. आधुनिक प्रगत ब्रिटिश समाजासारखा आपला समाज का नाही हा प्रश्न काही विचारवंतांना पडला, त्याचे उत्तर तिथे काही अंशी असणारी स्त्री पुरुष समानता हे होते, त्या तुलनेत आपल्या भारतीय स्त्रीया किती हलाखीचे जिणे जगत आहेत हे जाणवू लागले आणि मग पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे ह्यांच्या बरोबरीने महात्मा फुले, महर्षी कर्वे, महर्षी शिंदे प्रभ्रुतींनी स्त्री शिक्षणासाठी कंबर कसली. असे असले तरी मंगलाताई ह्या समाजसुधारकांच्या कार्याचे सुद्धा अतिशय परखड विवेचन करतात. स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी ,र.धों कर्वे , डॉ आंबेडकर ह्यांनी वेळोवेळी स्त्रियांच्या सामाजिक स्थितीबद्दल जे विचार मांडले आहेत ते वाचतांना एक स्त्री म्हणून आपण चक्रावून जातो, अचंबित होतो कधीकधी तर संतापही येतो, विशेषतः विवेकानंदांचे विचार वाचतांना त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची जी छाप आपल्या मनावर पडलेली आहे तिला मोठा धक्का बसतो. स्त्रीबद्दल त्यांची परस्परविरोधी विधाने वाचल्यावर त्यांनी खरच स्त्रीचा विचार केला होता का? असा प्रश्न पडतो. "आमच्या देशात व्यभिचारीणी स्त्री आढळली तर समाज तीला बहिष्कृत करतो, तिला समाजात कुठलेही स्थान उरत नाही, हे भयंकर आहे पण त्यामुळे आमचा समाज शुद्ध राहतो. " असे धाडसी विधान जेव्हा ते करतात तेव्हा ते पूर्वापार चालत आलेल्या जुन्याच धारणा पुढे नेतायेत हे स्पष्ट जाणवते. महात्मा गांधींनी तर तिला देशसेवेचे एक साधन मानले म्हणजे काय तर तिला शिक्षण मिळायला हवे , पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळायला हवेत, निर्णयस्वातंत्र्य हवे पण हे सगळे कशासाठी तर देशासाठी, तिने सुशिक्षित, सुसंस्कृत होऊन उत्तम प्रजा निर्माण करावी. विवेकानंद काय किंवा महात्मा गांधी काय त्यांना स्त्रीने शिक्षण घ्यावे, आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावे, पण पतीच्या आज्ञेत राहावे, तिने स्वतःच्या आधी कुटुंबाचा विचार करावा असेच वाटत होते, समाजातील नैतिकता जपण्याची जबाबदारी सर्वस्वी तिचीच, पुरुष ह्या सगळ्यातून कायमच मुक्त, त्याला कुठलीही बंधनं नाहीत, त्याच्यावर कुठलीही जबाबदारी नाही, त्याला जाब विचारण्याचा कोणालाही अधिकार नाही