Summary of the Book
मराठी साहित्याच्या आणि समाजजीवनाच्या समीक्षा क्षेत्रातील विद्याधर पुंडलीक यांचे हे दुसरे पुस्तक. `तिरंदाजी’मधील लेखांचे स्वरूप प्राधान्याने प्रतिक्रियात्मक आणि प्रतिसादात्मक आहे.
कथा, कादंबरी, ललित लेख, समीक्षा, नाटक अशा विविध वाङ्मयप्रकारांत वैशिष्ट्यपूर्ण स्थान असणार्या साहित्यिकांच्या लेखनाची वा त्यांनी प्रसंगी व्यक्त केलेल्या दृष्टिकोनांची चिकित्सा पुंडलिकांनी परखडपणे केलेली आहे. त्यांचे काही समीक्षालेख वाचताना त्यांच्यातला लेखक सतत जागृत असलेला जाणवतो. मग गो. नी. दांडेकरांची `माचीवरला बुधा’ ही कादंबरी असो, श्री. ज. जोशी यांचे कथाविश्र्व असो, ना. ग. गोरे यांच्यासारख्या विचारवंतांचे ललित लेख असोत. पुंडलिकांमधला रसिक समीक्षक आणि जिवंत लेखक अशा दुहेरी दृष्टीतून त्यातल्या सौंदर्याकडे आकर्षित होतो आणि त्या सौंदर्याची उकल हळुवारपणे करत राहतो.
विशिष्ट लेखकाच्या लेखनाच्या वा त्याच्या दृष्टिकोनांच्या मर्यादांचे अचूक विश्र्लेषण करणारी पुंडलिकांची सूक्ष्म नजर स्वतःच्या रूपवादी समीक्षादृष्टीचे सतत भान ठेवण्याचे औचित्यही दाखवते.
पुंडलिकांच्या या चौफेर समीक्षादृष्टीची ओळख म्हणजेच ही `तिरंदाजी’.