Omkar Dilip Bagal
13/10/2024
वाघनखं - रोहन बेनोडेकर
पुस्तक परीक्षण/ Book Review - ओंकार बागल
नवोदित लेखक रोहन बेनोडेकर यांची ही पहिलीचं कादंबरी. परंतू लेखकाने पुस्तकातील प्रत्येक ओळीत इतकी ताकद रचली आहे कि वाचकाला एक अन् एक प्रसंग प्रत्यक्ष नजरेखालून जाईल. 'वाघनखं' म्हटलं कि प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जो प्रसंग उभा राहतो तो म्हणजे अफजलखान वध. परंतू हा इतिहास म्हणजे केवळ अफजलवधाचा प्रसंग नसून एक भलंमोठं युद्धदेखील होतं. शिवाय या युद्धामागे अफजलखान वधाआधीच्या १२ वर्षांतील दक्षिण हिंदुस्थानातील कित्येक लहान-मोठ्या घडामोडी, राजकारणातील डावपेच, महाराष्ट्रातील शाह्यांनी एकमेकांवर केलेल्या कुरघोड्या आणि स्वराज्यावरील आघात अशा बऱ्याच गोष्टी होत्या.
ऐतिहासिक पार्श्वभूमीला धक्का न लावता, इतिहासात यत्किंचितही भेसळ न करता प्रसंगावधान राखून ही कादंबरी लिहिलेली आहे. लेखकांनी ही कादंबरी अतिशय बारकाईने रचली आहे. त्यासाठी त्यांनी अनेक थोर लेखक, इतिहासतज्ञ, इतिहास संशोधक यांनी यापूर्वी दिलेले पुरावे, समकालीन पत्रव्यवहार यांचे प्रमाण मानले आहे. यासाठी पुस्तकातील शेवटच्या २-३ पानांवर त्यांनी सविस्तर काळ-सूची आणि पुस्तके, लेखांची यादीदेखील दिली आहे. निरखून पाहिल्यास ही कादंबरी ६ भागांत विभागलेली असली तरी त्यांचा घटनाक्रम, राजकारणातील हालचाली, डावपेच, कूटनीती आणि स्वराज्याची आगेकूच एकमेकांत गुंतलेली आहे. प्रत्येक शहाला कटशह देण्याचा एकमेकांचा प्रयत्न, तिन्ही शाह्यांच्या दख्खनच्या पटावरील संघर्ष, त्यात एकमेकांशी होत असलेले तह, करार आणि उदयास येणारे स्वराज्य अशा बऱ्याच घडामोडी 'वाघनखं' या कादंबरीतून वाचायला मिळतात.
शिवाजी महाराजांनी केलेला अफजलखानाचा वध हा मुळात कित्येक वर्षांपासून खेळण्यात आलेल्या राजकीय संघर्षाचा शेवट होता. त्याची सुरुवात खरं तर शहाजी महाराजांपासून होते. शहाजी महाराजांची हाता-पायात बेड्या घालून काढलेली धिंड, आदिलशाहीत कैद, थोरल्या संभाजी राजांची कणकगिरीच्या वेढ्यात अफजलखानाने केलेली निर्घृण हत्या हे भोसले घराण्याच्या मुळावर केलेले आघात होते. शहाजीराजे बंगरुळात असताना वाढत असलेले स्वराज्य, त्यास येऊन मिळत जाणारे मावळे आणि स्वराज्याची एक महत्त्वाची लढाई सुभानमंगळ आणि पुरंदरची लढाई या प्रसंगापासून कादंबरीचे कथानक चालू होते. जावळी आणि वाईचे बदलणारे राजकारण, मराठ्यांचे अंतर्गत कलह, चंद्रराव मोरे आणि बाजी घोरपडेंसारख्या स्वकीयांचा स्वराज्याला असणारा विरोध आणि त्याचा फायदा घेणाऱ्या परकीय शाह्या. कधी आदिलशाही विरुद्ध मुघल तर कधी आदिलशाही विरुद्ध स्वराज्य अशा दख्खनच्या राजकारणात अफजल खान, औरंगजेब आणि शिवाजी महाराज यांच्यात चालू असणारे किचकट डावपेच वाचकाच्या बुद्धीशी द्वंद करतात.
'वाघनखं' या कादंबरीतून अफजलखान वधाच्या अगोदर काही वर्षांपूर्वी घडलेल्या घटना वाचायला मिळतातचं. शिवाय वाचायला मिळते ती शिवाजी महाराजांची मुत्सद्देगिरी, तल्लख बुद्धी, दूरदृष्टी आणि धाडसी निर्णयक्षमता. लेखकांनी महाराजांमध्ये असलेले बरेच गुणकौशल्य वेळोवेळी विविध प्रसंगांतून नमूद केलेले आहेत. बजाजी निंबाळकर यांचा पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश करतेवेळी शिवाजी महाराजांनी दाखवलेले धर्मपांडित्य, प्रतापगड आणि रायगड किल्ल्याची योग्य जागा हेरून केलेली बांधणी, शत्रू गटातील मुरारबाजी देशपांडेंसारख्या स्वकीय कर्तबगार माणसांची योग्यता ओळखून त्यांना स्वराज्यात सामील करणे, कल्याणच्या लुटीत सापडलेल्या विजापूरकर सुभेदाराच्या सुनेची खण व नारळ देऊन केलेली पाठवणी, कल्याणजवळ समुद्रात आपली हुशार माणसे पोर्तुगीजांसोबत ठेवून आत्मसात केलेले गलबत बांधण्याचे कौशल्य, समुद्रात स्वतःचे आरमार बनवण्याचे धाडस व दूरदृष्टी असे कित्येक पैलू लेखकाने या कादंबरीतून वाचकांसमोर ठेवले आहेत.
अफजलखान संधी साधून पैजेचा विडा उचलून जावळीत दाखल होतो. त्यांनतर त्याने वाई, जावळी आणि स्वराज्याच्या सीमेवर घातलेले थैमान, हिंदू देव देवतांची केलेली विटंबना, तुळजापूर, पंढरपूर आणि शिखर शिंगणापूरला केलेला उपद्रव, अफजलखान आणि शिवाजी महाराजांची सावध भूमिका, एकमेकांवरील छुपी आक्रमणे, राजकारणातील डावपेच, दोघांची एकमेकांविरुद्धची मुद्सद्देगिरी, अफजलखानासोबत युद्ध करण्यासाठी महाराजांनी केलेली तयारी, बहिर्जींच्या हेरांचे चोख काम, पंताजींचे अफजलखानासोबतचे चखेल संभाषण व संवादकौशल्य, अफजल भेटीचा नाट्यप्रसंग, या सगळ्या धामधुमीत सईबाईंचे निधन, त्यातून सावरलेले शिवाजी महाराज आणि सरतशेवटी अफजलखान वधाचा भलामोठा प्रसंग अशा बऱ्याच गोष्टी या कादंबरीत आहेत.
लेखकांची भाषा जितकी मृदू तितकीच धारदार आहे. विशेष म्हणजे यात बऱ्याच ठिकाणी पत्रव्यवहार आणि त्यातील मजकूर असल्याने वाचकाला ते अतिशय रंजक वाटतात. लिखाणातील सवांदकौशल्याची जितकी दाद द्यावी तितकी कमीचं. या कादंबरीतून लेखकांनी बारीक बारीक छटा इतक्या नैसर्गिक आणि सहजरीत्या लिहिल्या आहेत कि वाचकाच्या मनात तो प्रसंग जशाच्या तसा उतरतो. महाराज आणि त्यांच्या सरदारांसोबतचे सवांद, सदरेवरील प्रसंग, गुप्तहेरांच्या बातम्या, स्वराज्यातील रयतेची महाराजांवरील श्रद्धा, मावळ्यांमध्ये एकमेकांविषयी असलेला जिव्हाळा, समर्थ रामदास स्वामींनी राजांना दिलेला संदेश व उपदेशदेखील वाचायला मिळतो. हे युद्ध म्हणजे नीतीमत्तेची शिकवण लोकांच्या मनात रुजू करणारे युद्ध होते. एकंदर ही कहाणी लेखकांनी सहा भागांत विभागली असली तरी त्यांची गुंफण मात्र नेटाने केली आहे.
अफजलखान वधाची ही कहाणी म्हणजे केवळ एक युद्ध नसून दोन राजकारणी धुरंदरांनी बुद्धीचातुर्याने खेळलेला पटावरील डाव आणि प्रतिडाव होता, जो लेखकांनी 'वाघनखं'या कादंबरीतून उत्तमरीत्या मांडला आहे. जितकी थरारक आणि रोमांचक तितकीच प्रेरणेने भरलेली किल्ले प्रतापगड युद्धाची ही कहाणी आजच्या पिढीला संकटांशी सामना करण्याचे बळ देणारी आहे.
-©ओंकार दिलीप बागल
7506582341/ bagalomkar2@gmail.com
Insta ID - omkarbagal_marathibookreviews