Summary of the Book
भटक्याची डायरी - दहा-बारा देशांमधल्या पंचवीस-तीस शहरांमध्ये हिंडलेल्या एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय पुणेकराची ही डायरी आहे! कामानिमित्त जगभर हिंडत असताना घडलेले प्रसंग, आलेले अनुभव आणि ते अनुभवत असताना किंवा नंतर मनात आलेले विचार ह्या डायरीमध्ये आहेत. ही डायरी तारीख, वारानुसार मांडलेली नाही. वीस वर्षांच्या भटकंतीच्या काळातल्या डायरीची शे-दोनशे पानं एकत्र करून समोर ठेवली आहेत. हे टूर गाइड किंवा प्रवासवर्णन नाही, तर एका ग्लोबल भटक्याचं ‘प्रवासचिंतन’ आहे!
सुखांचे सॅशे - आपण आपल्या आयुष्यात सुखांच्या मोठ्या मोठ्या पॅकेट्सच्या मागे अहोरात्र धावत असतो. मोठ्ठं घर, मोठ्ठी गाडी, भरपूर बँक बॅलन्स, अफाट प्रसिद्धी, प्रचंड यश, वगैरे वगैरे वगैरे... सुखांचे हे भले मोठ्ठे पॅक्स मिळावेत म्हणून आपण जीवापाड मेहनत करत राहतो. हे मोठे पॅक मिळाले, तरच आनंदी होतो. नाही मिळाले तर किंवा मिळत नाहीत तोवर दु:खी राहतो.
पण सुखं ही फक्त मोठ्या पॅक्समध्ये मिळत नाहीत, तर छोट्याशा सॅशे मध्येही मिळू शकतात; हे आपण लक्षातच घेत नाही!
अशा छोट्या छोट्या सॅशेजमधून मिळणार्या छोट्या-मोठ्या सुखा-आनंदाविषयीचा हा ललित लेखसंग्रह!