Summary of the Book
जीवन सुंदर असून ते अधिक सुंदर करण्यातच माणसाच्या जगण्याचे तथ्य आहे; कारण भवचक्र फिरत राहणार असून जीवनसंगीताने ते व्यापलेले आहे, म्हणून जीवन प्रवाही होण्यासाठी रक्त खेळते हवे. रक्ताचा सलोनी झेला या पुस्तकातून व्यक्त होतो.
‘रक्त’ या नावाभोवती जे गूढ वलय आहे, त्याचं रहस्य उलगडत जाणारं हे पुस्तक इतिहासाचा परामर्श घेता घेता मनोरंजक पद्धतीनं अनेक शास्त्रीय तपशील मांडतं.
या पुस्तकातली रक्ताची गोष्ट रक्ताच्या गूढापासून जी सुरू होते, ती त्यातलं विज्ञान, त्याचा ‘रक्तरंजित’ इतिहास, त्यातले शोध, त्यातले भन्नाट आणि विक्षिप्त शास्त्रज्ञ, ती स्पर्धा, ती नोबेल पारितोषिकं, त्यातली गुन्हेगारी, दलाली, ठगगिरी आणि तसंच सचोटीपणा, प्रामाणिकपणा, जिद्द, शौर्य, माणुसकी अशा अनेक खाचखळग्यातून उमलत जाते.
इथे आपल्याला रक्ताचे घटक, त्यांचं कार्य, रक्ताभिसरण, रक्ताचे रक्तगट, त्याची साठवण आणि ब्लड बँक्स यातलं अतिशय रंजक विज्ञान आणि त्याचा इतिहास तर वाचायला मिळेलच, पण त्याशिवाय त्याविषयीच्या अनेक गोष्टी उलगडत जातील.
ब्लड ट्रान्स्फ्यूजन म्हणजेच रक्ताच्या देवाणघेवाणीचा इतिहास आपण यात अनुभवू, तर पूर्वीच्या काळी अनेक रोगांवर उपाय म्हणून माणसाचं रक्त चक्क भळाभळा वाहू देणं या ‘ब्लड लेटिंग’च्या पद्धतीचा भीषण इतिहास आपल्या अंगावर काटे आणेल.
ब्लड ट्रान्स्फ्यूजन आणि ब्लड बँक्स यांचा इतिहास आणि त्यामागच्या विज्ञानाबरोबरच रक्ताचा बाजार कसा उभा राहिला आणि फोफावला याचा इतिहासही आपल्याला चकित करून सोडेल.
दोन्ही महायुद्धात रक्तपेढ्या, रक्तदान आणि ट्रान्स्फ्यूजन यांचा काय रोल होता हेही आपल्याला समजेल.
यानंतर रक्ताचा व्यापार, त्याचं जागतिकीकरण आणि एड्स, हिमोफिलिया आणि हिपॅटायटिस असे रक्तविकार याविषयी हे पुस्तक आपल्याला सखोल ज्ञान पुरवेल.
सर्वसामान्य वाचक, विज्ञानप्रेमी अभ्यासूंप्रमाणेच वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांनादेखील हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही.