Summary of the Book
ह.मो. मराठे यांनी मार्केट ही कादंबरी १९८६ साली लिहिली.
कादंबरीतील काही संदर्भ २० वर्षापूर्वीचे असले तरी आजही ही कहाणी तितकीच समर्पक किंबहुना अधिकच वास्तव वाटते. पैशाचे जीवनात वाढलेले महत्त्व आणि स्वत्व, आत्मीयता, प्रेम, प्रामाणिकपणा या जीवनमूल्यांचा झालेला र्हास ही या कथेची मध्यवर्ती संकल्पना.
कादंबरीचा नायक मि. केळकर हा माकेर्टिंग ऑफिसर आहे. कुठलीही वस्तु आपण मार्केटमध्ये विकू शकतो. हा त्याचा आत्मविश्वास आणि अहंकार. ही स्वत:ची इमेज सांभाळण्यासाठी तो कुठल्याही थराला जातो. भ्रष्टाचार हा त्याचा सवयीचा आणि कौशल्याचा भाग बनतो. या सर्वातून मिळणार्या पैशाची त्याला चटक लागते.
मिसेस केळकर ही बँकेत नोकरी करत असते. लोकांची कर्ज पास करण्याच्या कामात हळूहळू तीही नितीमत्ता हरवून बसते. तिचीही पैशाची चटक वाढू लागते. पती-पत्नी दोघेही पैशाच्या धुंदीत जगत असतात. मुलीवर झालेला अत्याचारही त्यांना जाग आणू शकत नाही.
पैशाचे विष त्यांच्या अंगात भिनत गेलेले असते.
समाजात चालू असलेले सर्व गोष्टींचे विकृतीकरण, मूल्य जाणीवांचा र्हास आणि रक्ताच्या नात्याचे व्यापारीकरण यांचे मर्मभेदक चित्रण करणारी, गतिमान कथानक असूनही विचार करायला लावणारी कादंबरी.