Summary of the Book
पंचवीसहून अधिक वर्षे `महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक म्हणून काम करताना श्री. गोविंद तळवलकर यांनी नाना ग्रंथ, विविध विषय, अनेक व्यक्ती यांबद्दल विपुल लेखन केले. अशाच निवडक लेखांच्या या संग्रहात त्यांच्या अफाट व्यासंगाचे व रसिकतेचे मनोहारी दर्शन घडते. लोकमान्य टिळकांपासून ते शेक्सपियरपर्यंत व काश्मीरपासून ते वर्डस्वर्थची स्वप्नभूमी असलेल्या ब्रिटनमधील सरोवराच्या प्रदेशातून केलेली ही संवेदनशील मनाची प्रसन्न सफर आहे. छोट्या छोट्या निरीक्षणातून गवसलेले भव्य अर्थ आहेत आणि सहज शैलीत स्फुरलेले गहिरे भाष्यही आहे. रवींद्रनाथ टागोर व शरच्चंद्र चतर्जी, यांच्या वाङ्मयाचा रसिला वेध आहे आणि लेनिन, जिमी कार्टर, जॉर्ज ऑर्वेल, जे. के. गालब्रेथ, पंडित नेहरू, क्लिन थॉमस, चर्चिल, अॅटली, कुसुमाग्रज, स्वातंत्र्यकवी गोविंद अशा कितीतरी क्षेत्रांतील नामवंतांची रंजक माहिती ते देतात. बर्लिन, हायडेलबर्ग, लंडन, न्यूयॉर्क, हॉर्वर्ड येथील भ्रमंती आहे. ग्रंथ हे तर तळवलकरांचे जिवाभावाचे सखे. त्यामुळे ग्रंथ, ग्रंथालये, वाचन या संबंधीचे उद्बोधक लेख यात आहेत. रामायण-महाभारत या दूरदर्शनवरील मालिकांबाबत मार्मिक मल्लीनाथी करता करता एका व्यापक आशयाचे परिमाण ते देतात आणि श्वानप्रेमींच्या कथा सांगतानाही रममाण होऊन जातात. शब्दांचे अवडंबर न माजवता सहजसुंदर शैलीत लिहिलेल्या या लेखांतून सूक्ष्म चिंतनाचा झरा वाहतो आहे व तात्कालिकाचे संदर्भ असूनही कधीही न कोमेजणारा हा `बहर’ आहे.