Summary of the Book
इंद्रजित भालेराव यांच्या कवितेचा नायकही अशा अनेक दिव्यांपैकी एक आहे, ज्याची नाळ मातीशी बांधली गेलेली आहे. 'माती असशी, मातीत मिळशी' असं माती कुंभाराला म्हणते, तरीही तो जीवाच्या आकांताने तिला तुडवत असतो. आपल्या जीवनमरणाचे सारे संदर्भ मातीशी एकरूप झालेले आहेत, हे जाणून तो आयुष्यभर तिच्यातून दिव्यभव्य असं सृजनात्मक स्वप्न साकार करण्यासाठी धडपडत असतो. आपल्या हाताने निर्माण केलेल्या या सृष्टीच्या मोबदल्यात तो मातीत मिळणे समाधानाने स्वीकार करतो. आपला नायकही असाच आहे, भुईतून उगवलेला अन घाम गाळत झिजून झिजून मातीत मिळणारा. आतडी फाटेस्तोवर कष्ट करूनही आपल्या हाती बाकी काही येत नाही हे कटू सत्य त्याला जाणवलेले असते, तरीही त्याला आपल्या ठाईची सृजनशीलता गप्प बसू देत नाही. म्हणूनच शेतकरी कधी इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे संपावर जात नाही किंवा गिरणी मालकांप्रमाणे आपल्या शेतीच्या व्यवसायाचे दिवाळे काढत नाही.
जन्माला येताच तोंडात माती घालणारा... पावलं टाकायला लागला की ओल्या मातीचे बैल करणारा... कळता झाला की खऱ्याखुऱ्या ढोरामागं जाणारा... लग्न झाल्यावर आपल्या लाडक्या सगुनासोबत ढोरकाम करणारा... सगुना पोटातल्या गर्भासह पुरात वाहून गेल्यावर तिच्या वियोगाचे कढ आतल्या आत दाबून पुन्हा मातीशी एकरूप होणारा... त्याच्या जीवनाचं सार पुढील चार ओळीतून भालेराव यांनी प्रगट केल्या ---
माती झाली मही माय
मीही मातीचाच लेक
मातीतला खेळ आता
मनी येतो एक एक
येथे आठवण येते कृष्ण जन्माची.... वासुदेव लहानग्या कृष्णाला टोपलीच घेऊन यमुना पार करतो... नायक मात्र आपल्या बाळाला उद्देशून म्हणतो,
पोटातल्या बाळा आता
शिक पव्हनं पोटात
अभिमन्यूच्यासारखं
कसं शिरावं गोटात
पण हा अभिमन्यू सगुनाच्या पोटातून हे जग पाहण्यासाठी, शत्रूच्या गोटात शिरण्यासाठी, बाहेरच पडत नाही. अर्ध्या पुरात सगुणेच्या हातचं बैलाचं शेपूट सुटते आणि पाहता पाहता सगुणा पोटातल्या बाळासह पुरात वाहून जाते. येथे फुललेली, हातातोंडाशी आलेली सुगी सोंगण्याआधीच उलंगते. शेतीतील सुगी असो की तारुण्यसुलभ सुगी असो दोन्हीचं पर्यवसान दुःखात होते. अवर्षण, अतिअवर्षण, शेतीच्या मालात केले जाणारे चढउतार, शासनाच्या वांझोट्या योजना, भ्रष्ट अधिकारी, स्वार्थी पुढारी ही भोवतालची परिस्थिती इतकी दुःखदायक आहे की शेतकऱ्यानं शेतीचा धंदा बंद करून खुशाल संन्यासी व्हावं... पण असं कधी होत नाही. शेतीशी त्याची नाळ इतकी घट्ट बांधलेली आहे की ही सारी दुःख तो मातीत राबुन, मातीशी एकरूप होऊन विसरून जातो... सगुनाच्या मृत्यूनंतर नायकाची गत अशीच असते... सारं दुःख घेऊन तो मातीशीच संसार करायला सज्ज होतो.
आता मातीशी संसार
झाड झुडूपच बाळ
मव्हा मांडून पसारा
घरीदारी रानोमाळ
हे सनातन दुःख एकट्या कथानायकाचे नाही. ते अवघ्या शेतकरी वर्गाचे आहे. काबाडकष्ट, यातना, दुःख, शोषण, दुर्दैव या शेतकऱ्यास छळणाऱ्या ग्रहांच्या वक्रदृष्टीची ही काव्यकथा आपण अतिशय प्रभावीपणे मांडली आहे. आपली अनलंकृत, ग्रामीण शब्दकळा वाचकास मोहवुन जाते. म्हणून इंद्रजित भालेराव साहित्याला फार दिवसानंतर लाभलेलं 'अक्षरलेणं' आहे . भालेरावांची वेगळी स्वतंत्र पाऊलवाट निर्माण करणारी कविता यापुढेही अशीच अविरत अविष्कार घडवित राहणार आहे, यात शंका नाही.
अर्थात कुठे कुठे दोषही आहेत. पण एखाद्या गौरकाय येऊनेच्या गालावरच्या काळ्या तिळाने तिच्या सौंदर्यात काही उणीव वाटू नये, तसे हे दोष आहेत. वाचणाऱ्याच्या सपाट्यात ते दृष्टीआड होतात.
सरदार जाधव यांनी काढलेले मुखपृष्ठ, आतील रेखाटने पूरक अशीच आहेत. एकंदरीत वाचकाच्या मनात कायमचे घर करणारा असा इंद्रजित भालेराव यांचा काव्य संग्रह आहे.