Summary of the Book
'शारदीय मोरपिसे' हे पुस्तक कवितेविषयी कुतूहल वाटणाऱ्या कुणाही वाचकासाठी महत्त्वाचं यासाठी की कवितेचं कूळ आणि मूळ शोधणाऱ्या ह्या दोन लेखिकांनी वाचकांचं साधं कुतूहल कुठलीही भूमिका न स्वीकारता स्वच्छपणे जाणून घेतलं आहे. साऱ्याच वाचकांना ठाऊक असतं की, कवितेचा जन्म हृदयात होतो. पण कवितेचं स्फुरण ह्या हृदयात कसं अवतरतं हे त्यांना साध्या - सोप्या शब्दांत जाणून घ्यावं वाटतं. नेमकी हीच वाचकांची तहान समजून घेऊन अनेक संवेदनशील भावकवींच्या कवितांच्या जन्मकथा इथं रसाळपणे कथन केल्या आहेत. त्या स्वस्थपणे आस्वादाव्या अशा आहेत. आस्वादा - आधीची भावस्थिती मोकळी असली तरच कविता वाचनाचा आनंद लाभू शकतो, हे अप्रत्यक्षपणे इथं अधोरेखित झालंय.
कवितेचं रसपान करण्यासाठी, आस्वदातला आनंद वेचण्यासाठी असे कवितांचे निवड -संग्रह उपयुक्त असतात. पण जाणतेपणाची दिशा घेतलेल्या वाचकांनी स्वतःची एक स्वाभाविक वाट अवश्य चोखाळावी. नव्या कवितेचा उजेड हृदयात भरून घ्यावा आणि आपल्या आवडीच्या भावकवितांचा निवड-संग्रह सिद्ध करावा. मला वाटतं, 'शारदीय मोरपिसे' सारख्या पुस्तक-लेखनामागील हेतू हाच असावा.