Summary of the Book
जखमांचे सुगंधीपणा जपणारा 'इलाही' हा लेखसंग्रह वाचल्यानंतर प्रत्येक वाचकाला गजलकार इलाही जमादार यांच्या मोठेपणाचा परिचय होतो. एवढ्या मोठ्या आभाळागत प्रतिभा असणाऱ्या कलावंताला अजूनही अनेकजण ओळखत नाहीत, ही खंत प्रस्तुत ग्रंथामुळे बऱ्यापैकी दूर होईल, असे वाटते. 'इलाही' खरोखरच गजलेचा बाप आहे, असे माझे ठाम मत आहे. वैराग्यपूर्ण जीवन जगणाऱ्या या महान कलावंतावर आजतागायत कोणी अशा पद्धतीने ग्रंथ निर्माण केलेला नाही. ते महत्त्वपूर्ण कार्य नांदेडच्या डॉ. राम वाघमारे यांनी केल्यामुळे ते अभिनंदनास पात्र आहेत. या 'बाप' माणसावर त्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक लेखसंग्रहाची निर्मिती करून इलाही जमादारांना काही प्रमाणात न्याय देण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न केला तो अत्यंत स्तुत्य आहे.
प्रस्तुत लेखसंग्रहातील मान्यवरांचे लेख हे इलाहीच्या गजलेचे मोठेपण, वेगळेपण अधोरेखित करतात व त्यांच्या लेखन शक्तीवर प्रकाश टाकतातच, तद्वतच यांच्यातील माणूसपणावरही ते भाष्य करताना दिसतात. 'इलाही' ही या ग्रंथाची निर्मिती गजलेच्या दृष्टीने विचार केल्यास एक ऐतिहासिक दस्ताऐवज झाला आहे, असेच म्हणावे लागेल. आजघडीला 'इलाही जामदार' हे राज्यातील प्रमुख गजलकारांच्या पंक्तीतील एक मोठे नाव आहे. असंख्य धारावाहिके व चित्रपटाला त्यांची गाणी असून २५ पेक्षा अधिक त्यांचे गजलसंग्रह व २० हजारापेक्षा अधिक दोह्यांची निर्मिती त्यांनी केलेली आहे. अशा गजलेच्या बापावरची ही निर्मिती इलाहीच्या जीवनप्रवासाची नवी कलाकृती आहे, या त्यांच्या लेखसंग्रहास माझ्या अनंत शुभेच्छा !