dattjoshi
07 Jul 2018 12 52 PM
या पुस्तकातले उद्योजक हे आंत्रप्रेनर्स आहेत. अंगभूत कौशल्याच्या आधारावर जोखीम उचलून नवनव्या वाटा चोखाळणारे असे उद्योजक. या व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष फारसं केंद्रित न करता त्यांनी उभारलेल्या उद्योगांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. यातल्या बर्याचशा उद्योगांना अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंगची पार्श्वभूमी आहे. या उद्योगांमधले बारकावे व संज्ञा समजावून सांगताना इंग्रजी शब्द तसेच्या तसे वापरले आहेत. त्याचं विनाकारण मराठीकरण केलेलं नाही. कुठलीही अवघड कल्पना मांडताना फार खोलवर न शिरता तिची योग्य ती तोंडओळख होईल अशी समजावून सांगितली आहे. यामुळे बोजडपणा टाळून कल्पना नीट समजून घेता येते.
हे पुस्तक सर्वांसाठी उपयोगी ठरेल. अनेक प्रकारचे व्यवसाय, ते उभारताना आलेल्या अडचणी, त्याचा केलेला सामना, नवनव्या कल्पना, त्या प्रत्यक्षात आणण्याकरता उचललेली योग्य पावले, मनात असलेली जिद्द, धडाडी व प्रयत्न याचे समग्र दर्शन या पुस्तकातून होते. श्री दत्ता जोशींचा व्यासंग वाखाणण्याजोगा आहे. सुमारे पावणेतीनशे पानांचं हे पुस्तक बरंच शिकवतं. निरनिराळ्या संकल्पना मांडतं. विचारांना नवी दिशा देतं. - हर्षद सहस्रबुद्धे (सा. विवेक- १मे१८)