पत्रकार म्हणून कारकीर्द सुरू करताना आपल्याला दैनंदिन वृत्तपत्रात प्रवेश मिळणार नाही, याची पुरती खात्री होती. हे लक्षात घेऊनच केवळ दृष्टिहीन म्हणजे अंधच नव्हेत तर त्याबाहेरच्या म्हणजे डोळस व्यक्तींशीही संवाद साधता यावा आणि त्यांचा दृष्टिहीनांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा म्हणून ‘अक्षरतेज’ हा विशेषांक प्रसिद्ध करण्याचे आपण ठरविले, असे या अंकाची संपादिका अनुजा संखे हिने सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या मास्टर्स इन कम्युनिकेशन अॅण्ड जर्नलाझिम या पदव्युत्तर पत्रविद्या अभ्यासक्रमात शिकणारी पहिली दृष्टिहीन विद्यार्थिनी असलेल्या अनुजा संखे हिने ‘डोळस’मध्ये (म्हणजे छापील पद्धतीत) ‘अक्षरतेज’ या विशेषांकाची संकल्पना मांडली.
अंधांसाठी अंक काढायचा तर मग तो फक्त ब्रेल लिपीतच काढावा लागेल आणि अन्य लोकांपर्यंत पोहोचता येणार नाही. म्हणून मग या ‘अक्षरतेज’ विशेषांक सर्वाना वाचता यावा म्हणून ‘डोळस’मध्ये (छापील) काढण्याचे ठरविले. अंध व्यक्तींनी लिहिलेले साहित्य ‘डोळस’मध्ये आणणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे हाही हेतू ‘अक्षरतेज’ विशेषांक काढण्यामागे आहे. पहिल्या अंकातील महत्त्वाचा भाग असा की, अंध विद्यार्थ्यांना, अंध व्यक्तींना शैक्षणिक कामात मदत करणारे रीडर, रायटर, शिक्षक हे ‘डोळस’ असतात. अंधांविषयी सर्वसाधारणपणे लोकांना सहानुभूती वाटते. परंतु, त्यापलीकडे जाऊन अनेक गृहिणी रीडर, रायटर म्हणून आम्हाला मदत करतात. मग आम्हाला वाचून दाखवण्याचे काम ‘डोळस’असूनही त्या का करतात, त्यांना का करावेसे वाटते, त्यामागची त्यांची मनोभूमिका काय असते हे लोकांपुढे यायला हवे असे मनापासून वाटत होते. म्हणून त्यांचे विचार ‘अक्षरतेज’च्या या अंकात घेतले आहेत.
आणखी एक भूमिका अंक काढण्यामागे आहे ती म्हणजे दृष्टिहीनांना सर्वसाधारणपणे लोकांकडून फक्त सहानुभूती मिळते. परंतु, मदत करायला लोक फारसे पुढे येत नाहीत असा अनुभव आहे. म्हणून दृष्टिहिन व्यक्तींबाबतचा लोकांचा समज-गैरसमज दूर करण्याचाही उद्देश आहे. अन्य देशांच्या तुलनेत आपल्या देशात अंधांची संख्या मोठी असूनही फारशी जागरुकता दिसत नाही. ही जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘अक्षरतेज’ या विशेषांकाचा उपयोग होऊ शकेल, .आणि म्हणूनच ' डोळस' मध्ये (म्हणजे छापील पद्धतीत) जसा हा विशेषांक प्रसिद्ध केला तसाच, संपूर्ण विश्वातील वाचकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी, 'अक्षरतेज' हा विशेषांक
www.bookganga.com या संकेतस्थळावर ebook स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे.