Summary of the Book
‘पिकासो’नंतर ‘हिचकॉक’
सस्पेन्स चित्रपटांचा अनभिषिक्त बादशहा आल्फ्रेड हिचकॉक याचे हे चरित्र. मूकपटाच्या जमान्यात चित्रपटनिर्मिती आणि दिग्दर्शन यांना त्याने प्रारंभ केला. आणि नंतरची पन्नास वर्षे त्याने हॉलिवुड मध्ये अक्षरश: राज्य केले.
ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्या लेखणीतून उतरलेल्या चित्रकार पिकासो व हुसेन यांच्या चरित्रापाठोपाठ आल्फ्रेड हिचकॉकसंबंधातील या महत्त्वपूर्ण पुस्तकाची ही दुसरी आवृत्ती खास हिचकॉकच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रसिद्ध होत आहे.
हिचकॉकच्या प्रत्येक चित्रपटाची माहिती नाडकर्णी यांनी येथे दिली आहेच; त्याचबरोबर त्याच्या एकंदर कलात्मक यशापयशाची चिकित्साही त्यांनी केली आहे. इन्ग्रिड बर्गमन, ग्रेस केली, टिप्पी हेड्रेन यांच्यासारख्या सौंदर्यवान चित्रतारका, आणि ग्रेगरी पेक, कॅरी ग्रॅंट, रे मिलँड, यांच्यासारखे रुबाबदार नायक यांचे उल्लेख वाचकाला स्पेलबाउंड, नोटोरियस, डायल एम फॉर मर्डर या व इतर बऱ्याच एकाहून एक सरस चित्रपटांच्या ‘हिचकॉक’मय वातावरणात नेऊन सोडतील...