Summary of the Book
गेल्या पस्तीस-चाळीस वर्षांत मराठीमध्ये स्त्रियांची आत्मकथने पुष्कळच प्रसिद्ध झाली आहेत. ती सर्वच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सामाजिक, वाङ्मयिन, मानसशास्त्रीय-वाचनीयही आहेत. त्यांपैकी पुष्कळशी आपल्या कौटुंबिक सुखदु:खाची कथा पतीला केंद्रस्थानी ठेवून सांगणारी आहेत. काही मोजकी आपल्या विशिष्ट कार्यक्षेत्राला केंद्रस्थानी ठेवून त्या अनुषंगाने वैयक्तिक जीवनाची कथा सांगणारी आहेत.
मंगलाबाईंची आत्मकथा ह्या दुसऱ्या गटातील आहे. तिला वैयक्तिक जीवनकथेचे वावडे नाही; स्वत:च्या व्यक्तित्वाचा शोध घेण्यात चांगली गोडीही आहे. त्यामुळेच इचलकरंजी संस्थानात काका-काकूंच्या सहवासात गेलेले जितके खडतर तितकेच संस्कारपूर्ण असे दिवस त्यांनी मोठ्या सहृदयतेने, सुजाणपणाने वर्णन केले आहेत. त्यातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील ‘जग’ लहासहान घरगुती तपशीलांमुळे विशेष वाचनीयही झाले आहे. नवी ज्ञानलालसा, जुन्या रूढी-संस्कारांनी बांधून टाकलेले भावविश्व आणि वेळोवेळी परिस्थितीमुळे निर्माण होणारी अगतिकता मंगलाबाईंनी ज्या नजरेने टिपली आहे ती नजर त्यांच्या स्वत:बद्दल व्यक्तित्त्वाबद्दल-नेटक्या, काटेकोर, काहीशा ताठ – बरेच काही सांगून जाते.
लग्न होऊन भागवतांच्या घरात आल्याबरोबर भागवतांच्या स्वभावाच्या आणि कर्तृत्वाच्या अनुषंगाने अनुभवाला आलेली विविधांगी ‘समृद्धी’ त्या तेवढ्याच नेटकेपणाने सांगतात. भिन्न स्वभावाचे, वेगळी जीवनदृष्टी असलेले पती-पत्नी हळूहळू एकमेकांना कसे साहाय्यभूत झाले ह्याचा एक वास्तवदर्शी पट उपरी वाटावी अशी गौरवाची भाषा टाळून मंगलाबाई उलगडून दाखवितात.
डॉ. सरोजिनी वैद्य यांच्या प्रस्तावनेतून