Summary of the Book
लहानपणी आईकडून नर्मदा नदीची आठवण ऐकतानाच वासंती चितळे यांच्या मनात नर्मदा मैयाविषयी आकर्षण निर्माण झाले. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांना नर्मदा परिक्रमा करण्याचा योग आला. नोव्हेंबर २००८ ओंकारेश्वर येथे संकल्प करून पाच जणींसह परिक्रमेला सुरवात केली.
आई जशी लेकराची काळजी घेते, तशीच काळजी घेत मैयाने त्यांना संपूर्ण यात्रेत साथ केली, असा अनुभव आल्याचे त्या सांगतात. नर्मदेच्या किनाऱ्यावरील तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत, मुक्काम करीत त्यांची दरमजल सुरु असताना आलेली प्रचिती नर्मदेविषयीचा भक्तिभाव अधिक दृढ करीत होती. शूलपाणी जंगलातून जाण्यासाठी मैयाचा आशीर्वाद मिळाला.
गरुडेश्वरला प्रवीण या तरुण श्रावणबाळासारखा सोबती मिळाला. धावडी कुंडावरून जाताना पाय घसरत असताना आईच्या कडेवर असल्याची जाणीव झाली. देवगावला तब्येत बिघडूनही नियोजित प्रवास पूर्ण झाला. विक्रमपूर येथे रेल्वे रुळांशेजारून दीड तास चालताना एकही गाडी आली नाही, पण नंतर अखंड वाहतूक सुरु झाली. तसेच ठिकठिकाणी दिसलेली माणुसकी, मैयाचे सुखद दर्शन हे सर्व अनुभव लेखिकेने रोजनिशीच्या स्वरूपात लिहिले आहेत.