Summary of the Book
'सतारीच्या तारा' हे पुस्तक म्हणजे श्री. अॅन्थनी परेरा या एका जातिवंत शिक्षकाने आपल्या अंतरमनीच्या चिंतनाला दिलेले शब्दरूप. 'Once a teacher always a student' या इंग्रजी उक्तीला त्यांनी न्याय तर दिला आहेच; तसेच 'Once a teacher always a teacher,' हेही या साहित्यकृतीतील आपल्या 'बावीस' चिंतनाद्वारे त्यांनी अधोरेखित केले आहे. त्यांच्या लेखनीतून मराठी साहित्यिक, भारतीय तत्त्ववेत्ते यांचे किस्से जसे त्यांच्या ओघवत्या शैलीत आपल्यासमोर येतात तसेच पाश्चात्य तत्त्वज्ञांची आपणास जवळून ओळखही होते.
एक नैतिक अथवा आध्यात्मिक स्वरूपाचा विषय निवडून शिक्षक या नात्याने ते प्रत्येक लेखात व्यवस्थित व प्रभावीपणे विवेचन करीत जातात. ज्या पद्धतीने साने गुरुजी व विनोबा भावे अशा प्रकारच्या विषयांवर प्रबोधन करत जातात, त्याच पद्धतीने श्री. परेरा देखील वाचकांचे अंतरर्चक्षू उघडे करून त्यांच्यापुढे वेगवेगळ्या आदर्श व्यक्तींच्या पाऊलखुणा ठेवत जातात. त्यांचे चिंतन हे संकुचित स्वरूपाचे नसून व्यापक आहे व जवळजवळ सर्वच धर्मांच्या शिकवणुकीचा अंतर्भाव त्यांत आहे. सदरचे पुस्तक हे कोणत्याही रसिक वाचकाला केवळ भावणारेच नव्हे; तर उदबोधक ठरणारे आहे.