Summary of the Book
जळगाव जिल्ह्यातील एक शिक्षक कै. गणेश चौधरी यांच्या शोकान्त जीवनाची ही कथा. त्यांच्या धाकट्या भावाने सांगितलेली.
१९६८ च्या सुमारास गणेश चौधरी यांचा मानसिक तोल ढळू लागला आणि एका बेभान क्षणी त्यांनी आपल्या बायकोची व मुलांची हत्या केली. न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली पुढे तिचे रुपांतर जन्मठेपेमध्ये झाले. शिक्षेच्या काळात काही वर्षे मनोरूग्ण म्हणून त्यांना इस्पितळात ठेवण्यात आले. शिक्षा भोगत असतानाच त्यांच्या हातून काव्यलेखन आणि इतर साहित्यनिर्मिती झाली. हे सर्व लेखन पुस्तकरुपाने प्रसिध्द झाले. त्याला राज्य पुरस्काराचा मानही लाभला.
असे असले तरी १९६८ सालच्या 'त्या' घटनेनंतर गणेश चौधरी मनाने सतत खचतच होते. अखेरीस १९८० साली स्वत:च्या घरी, विकल अवस्थेत त्यांचे निधन झाले. १९६८ ते १९८० हा काळ चौधरी कुटुंबाला दाहक ठरला. घरातल्या मंडळींची खचलेली मने. सामाजिक निंदानालस्ती. दूरदुरच्या न्यायालयांमध्ये हेलपाटे. तुरुंगाच्या आणि मनोरुग्णालयांच्या वार्या, कर्जाचे वाढते डोंगर. वेडेवाकडे हेलकावे घेणारी गणेश चौधरी यांची मन:स्थिती आणि ढासळत जाणारी त्यांची प्रकृती, मोडून पाडणारे घर सावरुन धरण्याची पराकाष्ठा....
या सर्व अग्निदिव्यातून गेलेल्या दिवाकर चौधरींनी आपली तगमग, यातना, दु:ख या पुस्तकात शब्दबध्द केले आहे. त्यात कुठेही दंभिक दाखवेगिरी नाही. आहे ती परखड, प्रांजल मन:पूर्वकता.