Summary of the Book
मत्स्यप्रेमींसाठी नंदनवन मानल्या जाणार्या गोव्याच्या भूमीत खाणं आणि खिलवणं या दोन्ही गोष्टी तितक्याच प्रिय. खाण्यावर मनसोक्त प्रेम करणाऱ्या गोयंकरांच्या चवीही निरनिराळ्या- हिंदू, ख्रिश्चन, मालवणी आणि पोर्तुगीज पद्धतीचे विविध पदार्थ गोव्यात आपल्याला चाखायला मिळतात. गोमती सावर्डेकर लिखित ‘माय गोवा- गोवन रेसिपीज’ या पुस्तकात मत्स्याहार आणि शाकाहारी पाककृतींचा सम्यक मेळ घातला गेला आहे.
मत्स्यप्रेमींची जीभ खवळून टाकतील अशा बांगडय़ाची उड्डमेथी, पापलेटची आमटी, कोळंबीची आमटी, हिरव्या मसाल्यातल्या तिसऱ्या, कोंबडीची सागुती, सुक्या बांगडय़ाचं कालवण गोअन फ्राय फिश कोळंबीची भजी, खोबरं घालून अंडय़ाची भुर्जी अशा पदार्थाची पाककृती दिलेली आहेच, त्याचबरोबर अप्रतिम चवीच्या शाकाहारी पदार्थाची ओळखही करून देण्यात लेखिका यशस्वी ठरल्या आहेत.
यात काजूबिया आणि शहाळ्याची भाजी, ऋषीची भाजी, खतखते, केळफुलाची भाजी, कच्च्या फणसाची भाजी, सोललेल्या मुगाची उसळ, वडय़ा आणि वडिया आम, कांद्याची डाळ, तिरफळाची आमटी, मणगण, तवसळी, आंब्याचं सासव, आंबाडय़ाची चटणी, नीर फशणाचे काप, आंबाडय़ाचे वडे, सोलकढी आणि तिवळ अशा विविध पदार्थाचा समावेश करण्यात आला आहे.
क्षुधा शांत करतानाच जिव्हेचेही समाधान होईल, अशा पाककृतींचा समावेश असलेली ही पुस्तकं म्हणजे अस्सल खवय्यांना हे पदार्थ घरच्या घरी बनवण्याचे आणि चाखण्याचेही समाधान नक्कीच मिळवून देतील.