Summary of the Book
प्रस्तुत ग्रंथाचे वाचन करताना लेखनविषयाचा सर्वांगीण अभ्यास, विविध विचारवंतांच्या भूमिकांची साधार मांडणी करून त्यासंबंधी केलेले चिकित्सक विवेचन, इतरांच्या मतांची तपासणी करून आवश्यक तेथे स्वत: चे वेगळे मत मांडण्याची क्षमता, अशा प्रकारच्या गंभीर विषयाची मांडणी करताना पाळलेली शिस्त आणि असे वैचारिक लेखन करण्यासाठी आवश्यक असणारी भाषाशैली असे काही गुणविशेष सहजपणे लक्षात येतात. पारिभाषिक शब्दांचा अतिरेक आणि फारसे प्रचलित नसलेले शब्द वापरणेही प्रा. वासमकर यांनी टाळलेले आहे हे आवर्जून नोंदवले पाहिजे.
जीवनवादी आणि कलावादी विचारांची मांडणी सलगपणे, सुसंगतपणे आणि कोणत्याही भूमिकेवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन प्रा. वासमकर यांनी केली आहे. इतक्या सुसंगतपणे या दोन्ही भूमिकांची मांडणी मराठीमध्ये तरी प्रथमच झालेली आहे, असे म्हणणे अतिशयोक्तीचे नक्कीच होणार नाही. प्रस्तुत ग्रंथ मराठी समीक्षेत महत्त्वाची भर घालणारा ठरेल याची खात्री वाटते. साहित्यकृतीच्या आशयाला जसे आणि जितके महत्व असते, तसे आणि तितकेच महत्व तो धारण करू पाहत असलेल्या रुपाला, आकृतीला, अभिव्यक्तीलाही असते. दोन्ही दृष्टीने साहित्यकृती निर्दोष होणे महत्वाचे असते. व्यापक आणि व्यामिश्र जीवनदर्शनाला जितके महत्व असते. तितकेच महत्व त्याच्या निष्कलंक रूपसिद्धीलाही असते. हे अधोरेखित करणाच्या दृष्टीने प्रा. वासमकर यांचा हा ग्रंथ फारच महत्वाचा ठरणारा आहे.