Summary of the Book
निपुत्रिक हलवायानं गमतीनं बनविलेलं खर्याखुर्या बाळासारखं दिसणारं साखरेचं बाहुलं एके दिवशी खरंच जिवंत होतं अन् रात्री गुपचूप घराबाहेर पडतं. त्याच्यावर मग अनेक संकटं कोसळतात. ते मधमाश्यांच्या राज्यात जाऊन पोचतं, मुंगळे त्याला कैदी बनवतात, दांडगट मुलांच्या हाती पडून त्याचे प्राण जाण्याची वेळ येते. या सर्व संकटांवर ते कसं मात करतं याची अतिशय उत्कंठावर्धक गोष्ट सांगता सांगताच मधमाश्या अन् मुंगळे यांच्या कीटकजगताची शास्त्रीय माहिती रंजकतेनं देणारी ही कादंबरी. शास्त्रीय सत्यदेखील कसे भावरम्य करून सांगता येते ते दाखवणारी अनोखी बालविज्ञान-कादंबरी मराठीत प्रथमच प्रसिद्ध होत आहे.
मूळ तमिळ कादंबरी (मिट्टाई पाप्पा) चे लेखक श्री. `कल्वी’ गोपाळकृष्णन् (जन्म 10-10-1912) हे मुलांसाठीच्या व नवसाक्षरांसाठीच्या साहित्याचे एक श्रेष्ठ लेखक. 250 हून अधिक पुस्तके प्रसिद्ध. `मिट्टाई पाप्पा’, `सुंदविराल सीमा’, `वझिकानिय उथमार’ या पुस्तकांना युनेस्कोची पारितोषिकं; `परक्कुम पाप्पा’, `मन्थिर वथियिन मगन’ इत्यादि अनेक पुस्तकांना भारत शासनाची बालवाङ्मयाची व नवसाक्षरांसाठीच्या वाङ्मयाची अनेक बक्षिसे.
`मिट्टाई पाप्पा’ ही कादंबरी तेलुगू, मल्याळम व हिंदी भाषांत अनुवादित झालेली असून, बाल चित्र समितीने यावरून बनविलेल्या रंगीत व्यंगचित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळालेले आहे.
श्री. अनिल एकबोटे ह्यांनी अनुवादित केलेली `साखरेचं बाळ’ ही मराठी कादंबरी लहानांनाच नव्हे तर मोठ्यांनादेखील वाचावीशी वाटेल. अगदी पुन्हा पुन्हा.