Bookbandhu Reviews
30 Jun 2025 09 12 PM
तरल - हिमांगी हडवळे-नवले
पुस्तक परीक्षण - ओंकार बागल
दिवसभरात आपण कितीतरी ठिकाणांहून हिंडून येत असतो. वाटेत आपल्याला कितीतरी गोष्टी दिसतात, घटना पाहायला मिळतात. एके दिवशी, एखाद्या नेहमीच्या वाटेवर, काही न करता, कुठला तरी आडोसा पकडून, निपचित उभे राहा. शांत, संथ, स्वस्थ, कोणाशी काहीही न बोलता.. बस्स येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अलगदपणे पाहत राहा, निरीक्षण करा. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा भाव दिसेल, एक निर्विकार भाव! म्हणे चेहरा बोलका असतो, कसं काय बरं?
कारण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कळत नकळत एक भाव आपोआप उमटत असतो. ईश्वराने किंवा निसर्गाने मानवाला उपजतच एक संजीवनी दिली आहे, ती म्हणजे 'विचार करण्याची क्षमता'. परंतू या क्षमतेचा एक विचित्र पडसाद उमटला गेला आहे माणसाच्या आयुष्यावर, तो म्हणजे अतिविचार. त्यामुळे विचार आणि अतिविचार या दोहोंमुळे माणूस भले कुठल्याही विचारात असो, चालता बोलता त्याचे हावभाव बदलतात. वागण्याच्या, स्वभावाच्या, देहबोलीच्या आणि अंतरंगाच्या किमया बदलतात.
माणसाच्या बदलत्या भावना, त्याला आपसूकच बदलत जातात. या भावना आपण रोज जगत असतो, अनुभवत असतो, न्याहाळत असतो. आपल्या स्वतःच्याच काय तर इतरांच्या भावनादेखील आपण तितक्याच मनोभावे जपत असतो आणि ते योग्यही आहे. कारण माणसाचे मन आणि बुद्धी या दोघांचा ताळमेळ राखणे गरजेचे असते. मनातून भावना प्रकट होतात तर बुद्धीद्वारे विचार. विचार आणि भावना या दोघांचा समतोल साधणे अतिशय महत्त्वाचे असते. माणसाच्या मनात कधी कुठची भावना जन्म घेईल आणि डोक्यात कधी कुठला विचार निर्माण होईल, याची शाश्वती कोणीच घेऊ शकत नाही.
आपल्या आजुबाजूलादेखील अशा कित्येक वेगवेगळ्या प्रकारचे माणसे असतात. प्रत्येक जण डोक्यात एखादा विचार आणि उरात एखादी भावना घेऊन, आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी मार्गस्थ झालेला असतो. या भावनाचं असतात, ज्या माणसाला 'माणूसपण' बहाल करत असतात. अशा अनेक भावना घेऊन आपण जगत असतो, आपल्या मनातील तरल भावना. लेखिका हिमांगी हडवळे-नवले यांनी देखील अशाच त्यांच्या 'तरल' या कथासंग्रहातून अशाच मनमुराद भावनांचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला आहे.
तरल..तरल म्हणजे काय असतं हो नेमकं? भौतिकशास्त्रानुसार, तरल म्हणजे असा पदार्थ जो वाहू शकतो, ज्याला निश्चित आकार नसतो, तो ज्या भांड्यात ठेवला जातो, तो त्याचा आकार घेतो. मानवी मनाच्या संदर्भात सांगायचं झाल्यास, 'तरल' म्हणजे अतिसूक्ष्म, अस्थिर, नाजूक किंवा पटकन बदलणारा. काहीतरी जे निश्चित नाही, जे प्रवाही आहे आणि ज्याला लगेच पकडतादेखील येत नाही. अशाच गोष्टींचा, घटनांचा आणि भावनांचा बारकाईने अंदाज घेण्याचा या संग्रहातून प्रयत्न केला आहे.
लेखिका हिमांगी हडवळे-नवले यांनी 'तरल' या कथासंग्रहातून मानवी मन आणि भावना समजून घेऊन वाचकांसमोर व्यक्त केलेल्या आहेत. या संग्रहाची सर्वांत सुंदर बाब म्हणजे यातील प्रत्येक कथेतील एक सुप्त भावना. लेखिकेने ती अतिशय प्रभावीपणे वाचकांसमोर मांडली आहे. प्रत्येक कहाणीतून उत्कट होणाऱ्या भावना अतिशय हृदयस्पर्शी आहेत. या केवळ कथा नसून त्या संवेदना आहेत आणि संवेदना या नेहमी जागृत कराव्या लागतात. या कथांच्या माध्यमातून कितीतरी संवेदना जिवंत झाल्याचा अनुभव येतो.
या कथांद्वारे लेखिकेने बऱ्याच सुप्त भावनांना मोकळीक निर्माण करून दिली आहे. विविध कहाण्या, घटना, माणसे, प्रसंग, परिस्थिती इ. बारकाईने रचून त्यातील मर्म जाणून घेतले आहे. माणसाच्या मनातील तरल भावना कधीकधी हलक्याशा गुंतागुंतीच्या असतात, ज्या सहजासहजी ओळखता येत नाहीत, व्यक्त करता येत नाहीत. या भावना बऱ्याचदा आपल्या जागरूकतेच्या पलीकडे असतात; परंतू आपल्या विचारांवर, कृतींवर, स्वभावांवर, निर्णयांवर आणि एकूणच अनुभवांवर त्यांचा मोठा प्रभाव पडत असतो. अशाच गोष्टींवर या संग्रहातून अतिशय मार्मिकपणे चित्रण करण्यात आले आहे.
'तरल' या कथासंग्रहात एकूण १५ लहानशा कथा आहेत. प्रत्येक कथेतून एक विशिष्ट भावना व्यक्त होत जाते. या भावना अनेकदा अदृश्य असल्यासारख्या वाटतात, कारण त्याचा चटकन ठाव घेता येत नाही. 'तरल' मधून त्या अलगदपणे दिसू लागतात किंबहुना आपल्याला त्या साफ आणि स्वच्छपणे पाहता येतात. या अव्यक्त, अबोल आणि अदृश्य भावना या कथासंग्रहाच्या केंद्रस्थानी आहेत. या कथा तीव्र नसून, धूसर छटांसारख्या आहेत.
काही कथांमधून संमिश्र भावना प्रकट होताना जाणवतात. कारण बऱ्याचदा आपल्यात मनात अनेक भावनांचे मिश्रण तयार होऊन अनाहक गुंतागुंत निर्माण होत जाते. अशा गुंतागुंतींतून माणसांत अनेक बदल घडत जातात, त्यांचादेखील काही कथांमध्ये उल्लेख आढळतो. साधी, सोपी, ओघवती भाषा असल्याने त्यातील आशय समजून घ्यायला आनंद होतो.
विशेषतः स्त्रीमनाच्या गाभाऱ्याला उजाळा देण्याचा आशय उत्तम हाताळला आहे. प्रतिकूल शारीरिक आणि मानसिक परिस्थितीतून वाट काढत आयुष्य जगलेल्या स्त्रियांना मानवंदना दिल्यासारखी जाणवते. थोडक्यात, माणसाच्या मनातील तरल भावना म्हणजे आपल्या अस्तित्वाचा एक अविभाज्य घटक आहेत. त्या केवळ आपल्या अनुभवांना खोली देत नाहीत, तर आपल्याला स्वतःला आणि इतरांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतात. या भावनांना स्वीकारणे आणि त्यांना जाणून घेणे हे भावनिक बुद्धिमत्तेचे एक महत्त्वाचे लक्षण आहे.
'तरल' या कथासंग्रहातून लेखिका हिमांगी हडवळे-नवले यांनी माणसाच्या भावनिक बुद्धिमत्तेलादेखील एका विशिष्ट पद्धतीने साद घातली आहे. माणसाला जिवंत स्वरूप देणाऱ्या या भावनांना आर्त हाक दिली आहे. प्रत्येक कथेतून वाचकांना एका अचेतन भावनेने गुरफटून गेल्याचा अनुभव येईल. अशी भावना जी आपल्या मनातील दडून राहिलेल्या संवेदना जागृत करण्यासाठी नक्कीच मदत करतील. हा संग्रह केवळ भावनिक विचारांचा नसून 'सामाजिक संवेदनशीलता' हे त्यामागचे शाश्वत मर्म आहे. त्यामुळे वाचकांना 'तरल' हा संग्रह वाचायला नक्कीच आवडेल याची खात्री आहे.
-©ओंकार दिलीप बागल
Insta ID - bookbandhu_reviews