Summary of the Book
शब्दगौरी गौरी शिरसाट या शब्दगौरीची भेट मला तिच्या चांदणचुरा या कवितेने करून दिली. चांदणचुरा हे नावच मुळात रसिकाला खेचून घेणारे आहे. पुढे तिच्या कविता वाचल्या शिवाय राहवलेच नाही .
'_साठवून मनी सारे
लेक नांदते सासरी
माहेरची वाट मग
होते पंढरीची वारी ...
यातली कल्पकता किंवा
'_शब्द जपून ठेवावे
कधी करतील स्तुती
आणि नेटके बोलावे
कधी धरतील गती ...
हा आपल्या सर्वांचा अनुभव तर
'_शब्द पडती तोकडे
माया इतकी लावते
मला जोजवता हाती
जणू मायच शोभते ...
हे शब्दातील लडिवाळ पण मनाला मोहविते . गौरीकडे अलवार आणि सुंदर शब्दकळा आहे .
याचा ठायी ठायी प्रत्यय येतो . कारण ...
'_तुजवाचून कविते
सारे अवकाश रिते
कडेवरी घेशी आणि
अंगी अवसान येते ...
असं ती आत्मविश्वासाने सांगते
परमेश्वरापासून निसर्गापर्यंत आणि पक्षांपासून माणसांपर्यंत असा गौरी शिरसाट या
कवयित्रीचा लाघवी प्रवास आहे .
शब्द लालित्य , प्रतिमांचा सुयोग्य वापर, देखणी शब्दकळा , भाषसोष्ठ्व, लय ताल नादमाधुर्य
असलेला हा 'प्रथमा' काव्य संग्रह तिने रसिकांपुढे सादर केला आहे त्याला उत्तम रसिकाश्रय
मिलो आणि गौरीचे यापुढे असे एकामागून एक कविता संग्रह आपल्यापुढे येवोत अशा शुभेच्छा !