Summary of the Book
पितृवंशीय समाज व्यवस्था विशिष्ट सामाजिक-सांस्कृतिक संरचना निर्माण करीत असते. या संरचनेवर पुरुषप्रधानतेचा, पुरुष अस्मितांचा प्रभाव असतो. त्यामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान आहे. या वास्तवाची लिंगभाव दृष्टीकोनातून कठोर चिकित्सा 'अधांतरीचे प्रश्न' या संग्रहात पाहवयाला मिळते. त्यामुळे 'अधांतरीचे प्रश्न' हा अर्चना डावखर यांचा कवितासंग्रह वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. या संग्रहात स्त्रीत्वाच्या सनातन वेदनेचे आर्त स्वर उमटतात. हे सूर धीटपणे, रोकठोकपणे, रूढ संकेतांना टाळत अनेक प्रश्न उपस्थित करतात. हे प्रश्न स्त्रीचे एकलपण आणि पुरुषावालंबीत्व, तिचे अस्तित्व, कौटुंबिक, धार्मिक, जातीय, अशा सांस्कृतिक स्तरातून; तसेच पुरुषसत्ताक व्यवस्थेने निर्माण केलेल्या प्रश्नांतून जीवनाचे एक क्रूर, पाशवी रूप समोर आणतात. अर्थात यातून निर्माण झालेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे नीटपणे मिळू शकत नाहीत. म्हणून हे 'अधांतरीचे प्रश्न' प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला अस्वस्थ करणारे ठरतात. ते आपल्याला विचार प्रवृत्त करतील, असा विश्वास वाटतो.