Summary of the Book
'सार्वजनिक सत्य धर्म' या ग्रंथात महात्मा फुले यांनी त्यांना अभिप्रेत असलेल्या धर्मविचाराचे आणि नीतीमूल्यांचे प्रतिपादन केले असून सर्व मानवी समजाच्या उन्नतीचा मार्ग सांगितला आहे. या ग्रंथाच्या शीर्षकामध्ये 'सार्वजनिक', 'सत्य' आणि 'धर्म' या तीन अत्यंत महत्वाच्या शब्दांचा वापर केला असून त्यातून ज्यांच्या धर्मविचारांचे सूत्र स्पष्ट दिसते.
महात्मा फुले यांनी प्रस्तुत ग्रंथात प्रतीपादलेला धर्म सर्व मानवी समाजाला जगण्याचा रस्ता दाखवतो. त्यामुळे त्यांनी सांगितलेला धर्म सर्वार्थाने सार्वजनिक ठरतो. सत्य धर्माच्या अनुयायांनी कसे वागावे हे त्यांनी तपशिलाने सांगितले आहे. त्यातून त्यांचा व्यापक आणि सर्वसमावेशक दृष्टीकोन प्रकट होतो.
महात्मा जोतीराव फुले यांनी त्यांच्या धर्ममीमांसेत सत्य आणि नीती यावर विशेष भर दिलेला आहे. तसेच 'सार्वजनिक सत्य धर्म' पुस्तकात त्यांनी 'सत्य' नावाचे एक स्वतंत्र प्रकरण लिहिले असून सत्यवर्तन म्हणजे काय याची सविस्तर मांडणी केली आहे. फुल्यांची सत्याची कल्पना गूढवादी नाही. ते अंतर्ज्ञानाने प्राप्त होणारे सत्य नसून सामाजिक जीवन आणि नैसर्गिक घडामोडींकडे जागरूकतेने व जाणीवपूर्वक पहिल्याने कोणासही प्राप्त होऊ शकणारे सत्य आहे.
'सार्वजनिक सत्य धर्मा' चे स्वरूप आणि आशय इतर धर्माहून वेगळा आहे. हा धर्म सकल मानव जातीला सुखाचा मार्ग दाखवणारा, माणसांकडे असणाऱ्या विचारशक्तीला चालना देणारा आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांना प्राधान्य देणारा आहे. 'धर्म म्हणजे सिद्धांत नसून जीवनप्रणाली आहे', हे १८१० ते १८६० या काळात होऊन गेलेल्या थिओडोर पार्कर या बंडखोर ख्रिश्चन धर्मोपदेशकाचे मत महात्मा फुले यांनी सांगितलेल्या सार्वजनिक सत्यधर्माशी सर्वस्वी अनुरूप ठरावे, असे आहे.