Summary of the Book
भटका समाज म्हणून वडार समाजाची पूर्वपार ओळख आहे. महाराष्ट्राबाहेरील उगमस्थान असलेला वडार समाज महाराष्ट्रात स्थलांतरित झाला. तो प्रथम पुण्यात व नंतर राज्याच्या अन्य भांगात झाला. या समाजाचे स्थलांतर कसे झाले, त्या वेळची सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक स्थिती कशी होती, ‘वडार’ म्हणून त्यांनी आपली वांशिक ओळख कशी टिकवली, त्यांना कोणत्या अडचणी आल्या याबाबतचे संशोधन विनायक लष्कर यांनी ‘वडार समाज’मधून केले आहे.
वडारांचा इतिहास, वडार समाजावर संशोधनपर आधारित लिखाण, सामाजिक, आर्थिक पाहणी, आत्मचरित्रपर लेखन, मासिके, वर्तमानपत्रातील लेखन यांचा आढावा, ब्रिटीशकालीन, स्वातंत्र्योत्तर भारतातील, महाराष्ट्रातील अभ्यासकांची नोंद त्यांनी घेतली आहे. पुण्यात शिवाजीनगर भागात वडार समाज विसावला.
त्यावेळी एस. के. कुसाळकर हे वडार समाजाचे एक प्रमुख बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रसिद्धीस आले, अशी माहिती देऊन या समाजातील व्यावसायिक बदल त्यांनी नमूद केले आहेत. यात मुख्य भर हा पुण्यातील वडार समाजाचे जीवनमान, कुटुंबव्यवस्था, विवाह पद्धत, शैक्षणिक स्थिती, समाजातील स्त्रियांची सामाजिक स्थिती यातून समजते. एकूणच वडार समाजाचा समाजशास्त्रीय अभ्यास यातून केला आहे.