Summary of the Book
आयुष्याचं प्रतिबिंब दिवाळी अंकाने आपला दशकपूर्तीचा यंदाचा अंक ‘वेगळेपण विशेषांक’ म्हणून वाचकांना सुपूर्द केला आहे. मान्यवर लेखकांच्या साहित्याची मेजवानी देण्याची अंकाची परंपरा यंदाही कायम आहे. साहित्य, कला, समाजकारण, राजकारण, अध्यात्म, क्रीडा यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या कृतीने, योगदानाने आपले वेगळेपण सिद्ध करणार्या १०० हून अधिक दिग्गजांविषयीचे लेख अंकात आहेत.
वैज्ञानिक जयंत नारळीकर, गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत, ज्येष्ठ साहित्यिक द. भि., अरुण साधू, इतिहासतज्ज्ञ निनाद बेडेकर, सामाजिक कार्यकर्त्यां रेणू गावस्कर आदी मान्यवरांच्या मुलाखती यात आहेत. संपादक मिलिंद जोगळेकर यांनी एकाच वेळी १० मान्यवरांच्या हस्ते १० ठिकाणी अंकाचे प्रकाशन करत दिवाळी अंकाच्या प्रकाशाने सोहळ्याच्या परंपरेत एक वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला. प्रा. रा. ग. जाधव यांचा जगावेगळे मराठी प्रतिभावंत, योगेश सोमण यांचा मायाविश्व तसेच अनुया कुलकर्णी यांचा नायजेरियाविषयीचा लेख उत्तम आहेत. समर्पक व्यंगचित्रे व विनोदी कवितांनी वैचारिक लेखनाचा उत्तम तोल साधला आहे. अंकातील सारेच साहित्य वाचनीय आहे. मुख्यपृष्ठ रचनाही बोलकी आहे.