Summary of the Book
पर्यावरणीय समीक्षा ही ज्ञानात्मक संकल्पना आहे .तिच्या मुळाशी जीवनाचे अंधानुकरण नाही,मानवी कल्पनेचा विलास नाही किंवा मानसशास्त्रीय विश्लेषणाच्या नावाखाली काहीही बीभत्स लेखन नाही .प्रयोगांती सिद्ध झालेल्या ज्ञानात्मक सिद्धांतांचा स्विकार ही समीक्षापद्धती करते.अनेक विचारवंत,शास्त्रज्ञ ,निसर्गवादी,निसर्गप्रेमी आपापल्यापरीने या विषयाला भिडलेले आहेत.त्यांच्यासमोर मानवी गैरकृत्यातून आणि घोडचुकांतून निष्पन्न झालेले भीषण परिणाम आहेत.त्यावर त्यांचे प्रयोग,चिंतन ,मनन सुरु आहे. प्रयोग ,परिणाम,निरीक्षण,चिंतन ,निष्कर्ष ,सिद्धांतन आणि प्रत्यक्ष कृती या साऱ्यांचा अंतर्भाव प्रस्तूत समीक्षापद्धतीमध्ये होतो .माणसाने प्रत्यक्षात आपल्या जगण्याला विद्रूप करून टाकले.जणू त्याच्या जीवनाला महारोग जडला आहे.आणि त्याचे जीवन हे एक सडलेले,किडलेले,किळसवाणे असे भग्नशिल्प बनले आहे .या कुरुपतेची जाणीव त्याला हे पर्यावरणीय साहित्य करून देत आहे.त्यामुळे ही पर्यावरणीय चळवळ या कुरूप जीवनाला सुंदर,संपन्न बनविणारी चळवळ आहे.म्हणूनच पर्यावरणीय भूमिकेचा स्वीकार हा केवळ आवश्यक नव्हे तर तो कालोचित आहे.त्याला आजतरी पर्याय नाही....