Summary of the Book
पुस्तक पाच भागांत विभागले गेले आहे. नर्तनाचे अंतर्बंध, विचारमंजूषा, शोध व बोध, चिंतनिका आणि दर्पणी बघते, या पाच भागांतील 29 लेखांतून सुचेता भिडे यांचे आयुष्य आणि त्यांची नृत्यक्षेत्रातील वाटचाल उलगडत जातेच. पण, त्याचबरोबर नृत्य आणि त्याची परंपरा, तसेच तंजावरच्या मराठी राजाचे योगदान, नृत्यगंगा-जन्म नूतनशैलीचा या गोष्टी वाचकाला इतक्या सोपेपणाने सांगतात, की आपण काहीतरी अवघड समजून घेतोय, असे वाटतच नाही. कोणत्याही कलाप्रकारचे शास्त्र तयार झाल्याशिवाय त्याची जिवंत परंपरा निर्माण होणे अशक्यप्राय आहे, असे त्या पहिल्याच प्रकरणात सांगतात. कलावंतास आपल्या कलाविष्कारात शास्त्र आणि परंपरा या दोहोंची अभ्यासपूर्ण सांगड घालता येणे आवश्यक आहे, असे त्या सांगतात. लेखनात त्या याचे भान तर पाळतातच; पण कला आणि शास्त्र याची माहिती देताना कुठेही कंटाळा किंवा मजकूर रुक्ष होणार नाही, याची काळजी घेतात. त्यामुळे त्यांच्या नृत्याविष्काराइतकाच हा अक्षरांचा फेर विलोभनीय झाला आहे. पुस्तकातील सुचेता भिडे यांच्या नृत्याविष्कारातील भावमुद्रा अप्रतिम आहेत.