Summary of the Book
ग. प्र. प्रधान हे समाजवादी चळवळीतील एक झुंजार कार्यकर्ते. पुरोगामी विचार आणि इंग्रजी वाङ्मयाचा गाढा अभ्यास ही त्यांची ठळक वैशिष्ट्ये. मुळात ते प्राध्यापक. पुण्याच्या प्रख्यात फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी प्रदीर्घ काळ इंग्रजी भाषा आणि साहित्य यांचे अध्यापन केलं. पण त्याचवेळी ते अनेक चळवळीत अग्रभागी असत. साथी एस. एम. जोशी आणि ना. ग. गोरे या पुण्यातल्याच दोन ज्येष्ठ समाजवादी नेत्यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात अनेक तरुणांना भारावून टाकलं होतं.
पुढे 'प्रधान मास्तर' या नावानं ओळखला गेलेला हा तरुणही त्याच काळात त्यांच्या प्रभावाखाली आला. पण प्रधान मास्तरांवर केवळ समाजवादी विचारांचाच प्रभाव होता असे नाही, तर त्या काळात भारतात रुजू पाहत असलेल्या अनेक राजकीय विचारसरणींचाही ते तितक्याच गांभीर्यानं विचार करत. त्यातूनच त्यांचं रसरशीत असं व्यक्तिमत्त्व घडत गेलं.