Summary of the Book
क्लाउजवित्स या जर्मन लष्करी अधिकार्याने लिहिलेला `फॉम क्रीग’ हा ग्रंथ 1832 साली प्रकाशित झाला. युद्धशास्त्र व युद्धाचे तत्त्वज्ञान यांचे सर्वंकष विवेचन करणारा हा ग्रंथ एक अभिजात ग्रंथ म्हणून जगभर मान्यता पावला. जर्मन सेनापती मोल्टकेपासून हिटलरपर्यंत व मार्क्ससारख्या विचारवंतांनाही या ग्रंथाने प्रभावित केले. फ्रेंच, जपानी, तसेच अमेरिकी लष्करानेही या ग्रंथाचा सखोल अभ्यास केला आणि त्यातले सिद्धान्त प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला.
फॉम क्रिग (ऑन वॉर) च्या प्रकाशनानंतरच्या गेल्या 160-165 वर्षांत युद्धाच्या तंत्रात व स्वरूपात आमूलाग्र बदल झाले असले तरी क्लाउजवित्सचे महत्त्व कमी झालेले नाही. अमेरिकी सत्ताधार्यानी क्लाउजवित्सकडे दुर्लक्ष केल्यामुळे अमेरिकेला व्हिएतनाम युद्धात नामुष्की पत्करावी लागली आणि क्लाउजवित्सच्या शिकवणुकीचा आधार घेतल्याने 1990-91 च्या आखाती युद्धात अमेरिकेला अपूर्व यश मिळाले असे निष्कर्ष एका प्रसिद्ध अमेरिकन लेखकाने काढले आहेत.
क्लाउजवित्सच्या या अजरामर ग्रंथाचा चिकित्सक मराठी अनुवाद केला आहे प्रख्यात युद्धसमीक्षक व पत्रकार दि. वि. गोखले यांनी. `युद्धमीमांसा’ हा ग्रंथ युद्धशास्त्राचे अभ्यासक तसेच `युद्ध’ विषयाचे सखोल ज्ञान मिळवू इच्छिणारे वाचक या दोघांनाही मूल्यवान वाटेल.