Summary of the Book
विज्ञान - तंत्रज्ञान युगात विज्ञानाचा प्रसार करण्याचे एक प्रभावी मार्ग म्हणजे 'विज्ञानकथा'. कथेच्या माध्यमातून, मनोरंजक पद्धतीने काल्पनिक विज्ञान संकल्पना वाचकांपर्यंत यातून पोचविल्या जातात. अशाच आकर्षक कथा प्रा. सुनील विभुते यांनी 'विस्मयकारी विज्ञानकथा'मधून सांगितल्या आहेत.
'चक्रव्यूह' कथेमध्ये मिलिंद उबाळे याचे वडील प्रामाणिक पोलीस अधिकारी असतात. मात्र, खोटा बनाव करून लाचखोरीत अडकविल्यानंतर ते आत्महत्या करतात. त्याचा बदला घेण्यासाठी मिलिंद 'लिगॅन एक्स' या विषारी वायूचा वापर करतो. वटवाघळांच्या हालचालींच्या तंत्राचे रोपण माणसामध्ये केल्यास अंध व्यक्तींना फायदा होईल का? याचे संशोधन बॅटमॅन कथेचा नायक करतो.
अमेरिका महासत्ता बनून राहण्यासाठी 'ऑपरेशन सुपरपॉवर'मध्ये उदय मनाच्या वेगाने काम करणाऱ्या सॉफ्टवेअरचा शोध लावतो. वाहनांमधून निघणाऱ्या कार्बनडाय ऑक्साईडचे रुपांतर ऑक्सिजनमध्ये करण्याच्या प्रयोगाची कथा 'रंग मावळतिचे' ही वाचायला मिळते. जीव, भौतिक, रसायन, खगोल, अंतराळ, वैद्यकीय, औषधी, पॉलीमर, संगणक अशा विविध शाखांतील संकल्पनांवर आधारित सहज समजतील अशा व दैनदिन जीवनाशी निगडीत विषयांवरील या कथा मनोरंजक आहेत.