Summary of the Book
झिप्री! छप्पर झिप्पर केसांची... नि मोठ्या मोठ्या डोळ्यांची! आंबापाड्यावरची छोटुकली आदिवासी पोर. झाडाखाली भरणार्या शाळेत शिकणारी. झाडावर कावळ्यांची शाळा नि झाडाखाली झिप्रीची शाळा! मज्जा ना दोस्तांनो?
पण एक दिवस शहरातली मधुगुरुजींची मुलं झिप्रीच्या आंबापाड्यावर आली नि झिप्रीला नवं स्वप्न देऊन गेली. शहरातल्या शाळेत शिकायचं स्वप्न! शिकून मोठ्ठं व्हायचं स्वप्न!
एक दिवस झिप्रीच्या आईनं खरंच मधुगुरुजींच्या शाळेत आणून घातली की पोग्गी! आणि आपल्या छप्परझिप्पर झिप्रीला नवी मैत्रीण मिळाली.
सोहा!
आंबापाड्यावरल्या आदिवासी घरट्यातलं हे आपलं पिल्लू शहरातल्या शाळेत रुळलं का?
रुळलं का म्हणून काय विचारताय दोस्तांनो? अहो शहरातल्या गुरुजींना सळो की पळो केलं तिनं. अशी धमाल... अशी धमाल... की बस्! त्यात एक दिवस टीव्हीवरल्या चमचमत्या जाहिरातीत छप्परझिप्पर चमकली...
दोस्तांनो, झिप्री म्हणजे रानफूल. झिप्री म्हणजे रानझूल! तिच्या जमाडीजमती वाचायच्या आहे ना तुम्हाला?
चला तर मग... झिप्रीच्या चिमुकल्या जगात...