Summary of the Book
सोप्या मराठी भाषेत प्राथमिक आरोग्यशास्त्र म्हणजेच भारतवैद्यक.
यात नव्या-जुन्या वैद्यक-विद्येची सांगड घालण्याचा प्रयत्न आहे. आधुनिक वैद्यकशास्त्र हा याचा मूळ गाभा आहे, जोडीला आयुर्वेद व होमिओपथी उपचारांचे विवेचन आहे.
सुलभ रोगनिदानासाठी मार्गदर्शक आणि तक्ते हे या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. यावरून अनेक आजारांचे स्वत:च निदान करता येईल. यातला औषधसंग्रह निवडताना जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) प्रमाणित यादी थोडी भर घालून घेतली आहे.
या निवडक औषधांचे समग्र वर्णन तक्त्यांमधे दिलेले आहे. यावरून अनेक औषधांचा सुरक्षितपणे वापर करता येईल.
शरीरशास्त्र, रोगशास्त्र, पोषण-कुपोषण, रोगनिदानशास्त्र, शरीरसंस्थांप्रमाणे आजारवर्णन व त्यासोबत औषधोपचार हे तर यात आहेच. कोणते आजार धोक्याचे असतात, याचीही सूचना आहे. मुलांचे आजार, स्त्रियांचे आजार, प्रसूती, लिंगसांसर्गिक आजार, कुटुंबनियोजन, कर्करोग, वृद्धांचे आरोग्य, कामगारांचे आरोग्य, आपघात-प्रथमोपचार, व्यसनांचे दुष्परिणाम, विषारी पदार्थ, अन्नभेसळ, न्यायवैद्यक, ग्राहक संरक्षण कायदा व आरोग्य, इत्यादी अनेक उपयुक्त प्रकरणे ही झाली आणखी एक बाजू. आरोग्यवृद्धीसाठी वैयक्तिक आरोग्य, सार्वजनिक आरोग्य, व्यायामशास्त्र, आरोग्यशिक्षण हीही महत्त्वाची प्रकरणे आहेत.
सुमारे चारशेवर चित्रे, फोटो, पन्नासेक रंगीत फोटो यांमुळे माहितीला दृश्य परिमाण मिळते.
सर्व शाखांचे वैद्यकीय विद्यार्थी, जनरल प्रॅक्टिशनर, आरोग्यकार्यकर्ते, परिचारिका, अंगणवाडी शिक्षिका, आश्रमशाळा, शाळा-कॉलेजांची ग्रंथालये आणि जिज्ञासू वाचकांच्या दृष्टिने हे पुस्तक खात्रीने उपयुक्त आहे.
'सर्वांसाठी आरोग्य’ ही घोषणा खरी ठरायची असेल, तर 'भारतवैद्यक’ हे त्याचे आवश्यक साधन आहे. प्राथमिक आरोग्य सेवा म्हणजेच 'भारतवैद्यक'.