Summary of the Book
मराठीतील नव्या पिढीतील हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच जे व्यंगचित्रकार आहेत त्यात प्रशांत कुलकर्णी आघाडीवर आहेत हे निर्विवाद. भवतालच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीची किती अचूक जाण आणि भान त्यांच्यापाशी आहे याचं प्रत्यंतर त्यांच्या `अधांतरी दरबार’ या व्यंगचित्रसंग्रहात पदोपदी येते. ही पोट धरून हसवणारी `हास्यचित्रं’ नव्हेत; तर राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रांतील घडामोडींतील विसंगतींवर केलेलं नेमकं, मार्मिक, भेदक भाष्य आहे. 1990 ते 2001 या बारा वर्षांच्या `अत्यवस्थ कालखंडाचा हा व्यंगचित्रात्मक आलेख’ आहे असं त्यांनीच म्हटलंय. खरं तर एका संवेदनशील कलाकाराने एका तपाचा सादर केलेला हा रसरशीत दस्ताऐवजच असून तो अंतर्मुख करतो, विचार करायला लावतो हे त्यांचे मौलिक यश आहे.