Summary of the Book
चमत्कार ! चमत्कार करतोस ना समर्था !
तिरडीवरचं प्रेत जिवंत केलं होतंस ना ?
मग भर ना प्राण याही देहात ?
समाधीत दिलंस म्हणे मृत्यूचं दान !
धूर्त बकवास. मला ठाऊक आहे कुणी घेतला राघवचा प्राण ! पण मी किंचाळू शकत नाही. ओरडून सांगू शकत नाही. कारण माझ्या मनातील माकडं मीच मारून टाकलीत, माझ्या हातांनी, त्या पौर्णिमेच्या रात्री, केवळ आत्मसन्मानासाठी ! आत्मसन्मान ! सत्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा आत्मसन्मान ! मीच घेतलाय मढवून माझ्या ललाटी, माझ्यातील षंढत्व झाकण्यासाठी. राघवा, मी हतबल आहे रे. पंख छाटलेल्या जटायूची गत व्हावी, तसं झालंय माझं. मीच करून घेतलं माझ्या हातांनी. तू म्हणायचास तेच खरं, षंढाच्या हाती तलवार कधीच चमकत नाही. सत्याची तर नाहीच नाही. माझ्या मनातील माकडांनो, मी बोलू शकणार नाही कधीच ! कारण मी षंढ आहे. खरच मी षंढ आहे.
!! जय जय रघुवीर समर्थ !!