Summary of the Book
दुसऱ्याला ईश्वर बनवून आपल्या उद्धाराचा भार त्याच्यावर टाकण्याच्या धर्मभोळेपणामुळे भारतीय समाजाची अधोगती झाली आहे, असे सांगून उपेक्षित समाजाला जप, ताप सोडा; शिक्षण व सत्तेची कस धरा, असा प्रगतीचा मार्ग दाखविणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विविधांगी दर्शन मनीष कांबळे यांच्या 'डॉ. आंबेडकर दर्शन ' या ग्रंथातून होते.
देशात धार्मिक व राजकीय क्रांती घडवून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा बहुमोल अधिकार मिळवून देणाऱ्या बाबासाहेबांच्या कार्याचे दर्शन एस. एम. जोशी, प्रा. गं. बा. सरदार, प्रबोधनकार ठाकरे, य. दि फडके, आचार्य अत्रे, धनंजय कीर, यशवंतराव चव्हाण, गोविंदराव तळवलकर, डॉ. भालचंद्र फडके, डॉ. भा. ल. भोळे आदी मान्यवरांच्या लेखातून घडते. राजर्षी शाहू छत्रपती महाराज व सयाजीराव गायकवाड महाराज यांना बाबासाहेबांबद्दल वाटणाऱ्या जिव्हाळ्याचे मनोहारी दर्शनही यात होते.
बाबासाहेबांनी विद्यार्थी, तरुण, महिला, कार्यकर्त्यांना भाषणे व पत्रव्यवहारामधून केलेले मार्गदर्शन एकत्रितपणे वाचायला मिळते. त्यातून आंबेडकर यांचे जीवनध्येय व त्यांच्या राजकारणाची दिशा वाचकांना समजते. बाबासाहेबांच्या निधनानंतर देश-विदेशातील वृत्तपत्रांनी त्यांना वाहिलेल्या श्रद्धांजलीचे अग्रलेख - लेख ग्रंथात आहेत.